ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा
राज्यस्तरीय पुरस्कार
2026
आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठांना आधार, सन्मान आणि जगण्याचा नवा आनंद देणारे एक हक्काचे व्यासपीठ… म्हणजेच ‘ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा’!
१४ जानेवारी १९९२ रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून या संघाची स्थापना झाली. स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार कै. माधवराव गोटू पाटील यांच्या प्रेरणेतून आणि तत्कालीन नगराध्यक्ष कै. सीताराम नारायण अग्रवाल, स्वातंत्र्यसैनिक कै. मोतीलालजी गुजराथी, कै. व्ही.के. पाटील आणि कै. विठ्ठल निंबाजी बडगुजर यांच्या दूरदृष्टीतून या सेवाभावी प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कै. सीताराम नारायण अग्रवाल यांनी संघाचे पहिले अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली.
विधी व न्याय, शिक्षण, आरोग्य, कला-क्रीडा, विज्ञान आणि पर्यावरणासह विविध क्षेत्रांत संघाने अविरत कार्याचा ठसा उमटवला आहे. पर्यावरणपूरक हवेशीर परिसर, समृद्ध वाचनालय, विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठांसाठी उपयुक्त व्यायामशाळा यांमुळे हे केंद्र ज्येष्ठांचे दुसरे घर बनले आहे.
नियमित आरोग्य शिबिरे, निसर्ग सहली, आनंदमेळावे, वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमा यांसारख्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी इथल्या ज्येष्ठांचे जीवन चैतन्यमय केले आहे. केवळ उपक्रमच नव्हे, तर ज्येष्ठांच्या व्यक्तिगत अडचणींवर थेट संवाद, कायदेशीर सल्ला मार्गदर्शन आणि वाढदिवस साजरे करून संघाने कौटुंबिक जिव्हाळा जपला आहे. धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्राभिमानाचे संस्कार जपत संघ सदैव कार्यमग्न आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा संघ, खानदेश प्रादेशिक विभागातील सर्वोत्तम संघ आणि अतिउत्कृष्ट ग्रामीण संघ अशा अनेक सन्मानांनी या कार्याची पावती दिली आहे.
परिसरातील ज्येष्ठांच्या जीवनात सुरक्षितता, सहकार्य आणि स्वाभिमानाची ऊर्जा निर्माण करणाऱ्या ‘ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा’ यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान देताना अतिशय आनंद होत आहे.



