
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
मुंबई- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा - २०२६' अंतर्गत देण्यात येणारे 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या जडणघडणीत आणि समाजकार्यात निस्वार्थ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच संस्था व संघाचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कृतज्ञता सन्मान दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.
या वर्षीच्या कृतज्ञता सन्मानामध्ये महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने व ठाणे येथील बबन पाटणकर यांची निवड करण्यात आली आहे , तर दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील मानव कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' अंतर्गत सन्मानार्थी संघ म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सन्मानार्थी संस्था म्हणून पुणे येथील जनसेवा फाउंडेशन यांची निवड करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या या ज्येष्ठ मान्यवरांचा व संस्थांचा यथोचित गौरव या आनंद मेळाव्यात करण्यात येणार आहे.
मुंबई -यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा कविवर्य ना. धों. महानोर स्मृती साहित्य तसेच शेती-पाणी पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच मुंबईतील चव्हाण सेंटरमध्ये उत्साहात पार पडला. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून, साहित्यातील चार आणि शेती-पाणी क्षेत्रातील दोन अशा एकूण सहा मान्यवरांना गौरविण्यात आले. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, विचारवंत डॉ. सुधींद्र कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत महानोरांच्या समृद्ध आठवणींना उजाळा दिला. महानोरांचे विचार आणि कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जैन कुटुंबीयांच्या शेतीविषयक योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अपरिहार्य कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रफितीद्वारे मनोगत व्यक्त केले. महानोरांच्या साहित्याने निसर्गासोबतच ग्रामीण भागातील शेती, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतकऱ्यांचे कष्ट, महिलांचे संघर्षमय जीवन आणि नात्यांमधील दाहकता प्रभावीपणे मांडली, असे सांगत त्यांनी पुरस्कारार्थींना अखंड साहित्यसेवेचा संदेश दिला. यंदाच्या पुरस्कारांमध्ये साहित्य विभागात अविनाश उषा वसंत (मुंबई), श्रीकांत साव (चंद्रपूर), प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (बुलढाणा) यांना काव्यलेखनासाठी, तर विठ्ठल खिलारी (सातारा) यांना कादंबरीसाठी सन्मानित करण्यात आले. शेती-पाणी व्यवस्थापनातील उल्लेखनीय कार्यासाठी वैशाली पाटील (रावेर, जळगाव) आणि सीमा क्षीरसागर (कडवंची, जालना) यांना गौरवण्यात आले. या पुरस्कारांची निवड अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंडे, अजित भुरे, रमेश जाधव, शंभू पाटील आणि दत्ता बाळसराफ यांच्या निवड समितीने केली.
सोहळ्यात महानोरांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच शंभू पाटील आणि सहकाऱ्यांनी 'परिवर्तन, जळगाव' निर्मित संत कबीरांच्या तत्त्वज्ञानावर आधारित 'हंस अकेला' हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दत्ता बाळसराफ यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास युवराज मोहिते, प्रा. श्रीकांत देशमुख, प्रकाश होळकर, अशोक नेमाडे, राजश्री शिंदे, 'शबदालय'च्या सुमती लांडे, पत्रकार प्रशांत पवार, सरला महानोर, महानोर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्कार २०२६ ची घोषणा आज करण्यात आली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या ११ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील साहित्य आणि शेती पाणी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या पुरस्कारांची घोषणा चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आली. जळगाव येथील वैशाली प्रभाकर पाटील आणि जालना येथील सीमा क्षीरसागर यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार तर मुंबई येथील अविनाश उषा वसंत, बुलढाणा येथील प्रेषित प्रदिप सिद्धभट्टी, चंद्रपूर येथील श्रीकांत साव, सातारा येथील विठ्ठल खिलारी यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
शेती-पाणी आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण काम करत योगदान देणाऱ्या या सर्व पुरस्कारार्थ्यांना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे, पत्रकार रमेश जाधव इत्यादी मान्यवरांच्या निवड समितीने हे पुरस्कारार्थी निवडले आहेत, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील साहित्य आणि शेती-पाणी या क्षेत्रांतून अनेक जणांच्या कार्याचा आढावा घेताल्यानंतर हे पुरस्कारार्थी निवडले असून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."





नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.