वैशाली प्रभाकर पाटील

शेती-पाणी पुरस्कार
जळगाव
2026

हातात मातीचं गोंदण आणि काळजात संकटांशी भिडण्याचं अथांग बळ… ही केवळ एक कहाणी नाही, तर जळगावच्या रावेर तालुक्यातील दसनूरच्या तांबड्या मातीतून उमललेली संघर्षाची आणि सृजनाची अनोखी गाथा आहे म्हणजे सौ. वैशाली पाटील!

वयाच्या अवघ्या पंचविशीत नियतीने घाला घातला. वडील आणि भावाचं अकाली छत्र हरपलं... डोक्यावर तब्बल पन्नास लाखांच्या कर्जाचा डोंगर, शंभर वर्षं जुनं मोडलेलं घर आणि मागे राहिलेली कुटुंबाची जबाबदारी! पण संकटांपुढे मान झुकवतील त्या वैशाली ताई कसल्या? त्यांनी शेतीची धुरा हाती घेतली, अहोरात्र घाम गाळला, कुटुंबाचे पांग फेडले आणि कर्जाची राख करून आत्मसन्मानाचा नवा अंक लिहिला! पण नियतीची परीक्षा अजून संपली नव्हती. २०१६ मध्ये आईला ल्युकेमियासारख्या गंभीर आजाराने घेरलं. माऊलीच्या आरोग्यासाठी सकस, विषमुक्त अन्नाचा शोध सुरू झाला... आणि याच शोधातून जन्म झाला एका नव्या कृषी क्रांतीचा!

आईच्या उपचारासाठी त्यांनी दोन एकरांत 'खपली' या पुरातन गव्हाचं पहिलं बी रोवलं. आईच्या सुश्रुषेसाठी रुजलेली ती छोटीशी आशा पुढे हजारो शेतकऱ्यांची चळवळ बनली! मधुमेह आणि हृदयविकारावर गुणकारी, मातीचा कस वाढवणारा हा खपली गहू... दोन एकरांवरून सुरू झालेला हा प्रवास आज दीड हजार एकरांच्या शिवारात डौलाने उभा आहे! 'प्रभूराम बचत गट' आणि अधिकृत सीड डीलर परवान्याच्या बळावर त्यांनी खान्देश, मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश आणि तेलंगणापर्यंत या सकस गव्हाची महती पोहोचवली. वादळात उद्ध्वस्त झालेल्या केळीच्या बागांचं लाखो रुपयांचं नुकसान सोसूनही त्या कणखर राहिल्या. खचल्या नाहीत, थांबल्या नाहीत! आज खपली गव्हाचं प्रमुख केंद्र निर्माण करून हजारो अन्नदात्यांच्या वाटा उजळणाऱ्या त्या दीपस्तंभ ठरल्या आहेत.

रानकवी ना. धो. महानोरांच्या शब्दांत सांगायचं तर —

“पुन्हा पुन्हा जन्मावे, मातीतच रुजावे… मातीतच उगवून मातीचेच व्हावे!”

मातीशी अखंड इमान राखणाऱ्या आणि आपली अन्नसंस्कृती पुनरुज्जीवित करणाऱ्या सौ. वैशाली पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फौंडेशनचा 'ना. धो. महानोर शेती-पाणी पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.

Video Gallery