प्रगती बाणखेले

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
2026

पत्रकारिता म्हणजे केवळ रोजच्या बातम्यांचे वृत्तांकन नव्हे, तर समाजातील शोषिक, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणारे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे एक सशक्त माध्यम! हीच मूल्ये उराशी बाळगून ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांनी आपल्या पत्रकारितेचा प्रवास घडवला आहे. एम.एस्सी. रसायनशास्त्र या विषयात प्रथम वर्ग मिळवल्यानंतर, पत्रकारिता शिक्षणामध्‍येही विद्यापीठात प्रथम येत त्यांनी आपल्या अफाट बौद्धिक क्षमतेची प्रचिती दिली. गेल्या २० हून अधिक वर्षांपासून 'महाराष्ट्र टाइम्स'सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रात अविरत सेवा देताना, त्यांनी 'मैत्रीण' आणि 'हेल्थ प्लस'सारख्या लोकप्रिय पुरवण्यांच्या माध्यमातून हजारो वाचकांच्या मनात स्वतःचे हक्काचे आणि स्नेहाचे स्थान निर्माण केले आहे.

लेखणी जेव्हा संवेदनशील बनते, तेव्हा समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी होते! मुलींची घटती संख्या असो किंवा बालविवाहाचे भीषण वास्तव... मराठवाड्यातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या त्यांच्या 'बालाघाटातल्या बालवधू' या गाजलेल्या वृत्तमालिकेने अवघ्या समाजाची आणि प्रशासनाची झोप उडवली. 'युनायटेड नेशन्स' आणि अमेरिकेच्या 'पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरो' यांसारख्या मानाच्या फेलोशिप्सच्या माध्यमातून त्यांनी या गंभीर प्रश्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान, अमेरिका आणि श्रीलंका दौऱ्यांच्या माध्यमातून लिंगभेद आणि मानवी हक्कांसंदर्भात भारताचे प्रतिनिधित्व करत, त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या अभ्यासू आणि मूलगामी पत्रकारितेचा अमीट ठसा उमटवला.

त्यांच्या याच समृद्ध अनुभवांतून साकारलेल्या 'ऑन द फिल्ड' या पुस्तकाने साहित्य क्षेत्रात अत्यंत आदराचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या या उत्तुंग कर्तृत्वाचा गौरव म्हणून पत्रकारितेतील सर्वोच्च मानला जाणारा 'रेड इंक पुरस्कार', प्रतिष्ठित 'लाडली पारितोषिक' आणि 'दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कारां'सह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय सन्मानांनी त्यांना भूषवण्यात आले आहे.

निर्भीड वृत्ती, संवेदनशील मन आणि प्रगल्भ समाजभान जपणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व प्रगती बाणखेले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery