- Awards Content:
- वर्ष: 2024 , पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
कल्याण, मुंबई येथील, कृषी विभागातील सेवानिवृत्त संशोधन अधिकारी विजया शिंदे यांनी सेवानिवृत्तीनंतर एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. निष्क्रिय न राहता, त्यांनी समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले.
वृद्धाश्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे असो किंवा पूरग्रस्त महिलांना अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू पोहोचवणे असो हे कार्य त्या करत राहिल्या. विजया ताईंनी अनेक सामाजिक आव्हानांचा सामना केला. त्यांच्या करुणेची सीमा नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यांनी अनाथ मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला, त्यांना अन्न आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी महिलांना एकत्र केले आणि परंपरा आणि सामुदायिक भावना जोपासत भजनी मंडळे तयार केली.
सामाजिक कार्यासोबतच त्यांना साहित्याची देखील भरपूर आवड आहे. कविता, कथाकथन आणि साहित्यातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्याजोगे आहे.
समाजाचा पाया म्हणजेच शिक्षण आणि विजया ताईंनी शिक्षणाचा पुरस्कार करून संस्कार केंद्र चालू केले. त्या अंतर्गत त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ज्येष्ठ नागरिक संघासाठी ते आध्यात्मिक वाचन, सहली आणि इतर समारंभ आयोजित करतात. त्यांच्या एकुणात कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सेवानिवृत्ती ही विश्रांतीसाठी नसून या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, हे विजया ताईंच्या कार्यातून दिसून येते.
सेवाव्रत हाती घेतलेल्या विजया शिंदे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान देताना खूप आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024 , पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
2006 मध्ये कमल बारुळे औपचारिक सेवेतून निवृत्त झाल्या, पण त्यांचा सेवेचा प्रवास मात्र नुकताच सुरू झाला होता. एका ज्येष्ठ नागरिक संघात महिला संघटनेची सचिव म्हणून सुरुवात करून, लवकरच त्यांनी 2011 मध्ये श्री योगेश्वरी जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा बनल्या. 2018 पर्यंत, बीड, लातूर, परभणी आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये महिला संघटन त्यांनी वाढवले. 2018 मध्ये त्यांची दक्षिण मराठवाडा महिला प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.
त्यांच्या नेतृत्वाखाली महिला संघटनांची भरभराट झाली. डॉ. मायाताई कुलकर्णी आणि डॉ. बी.आर. पाटील यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या मार्गदर्शनाने, कमल यांनी तळागाळातील महिलांना सक्षम केले. महिलांच्या सत्तर विशेष बैठका घेतल्या, महत्त्वाच्या आवाजांना व्यासपीठ दिले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून असंख्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंद मेळाव्याचे आयोजन केले, ज्यामुळे समाजात आनंदाचे आणि सुखाचे बंध निर्माण झाले.
आपल्या निवृत्तीनंतरही, कमल बारुळे समाजासाठी एक मार्गदर्शक बनून राहिल्या, हे विशेष !
कमल बारुळे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान देताना खूप आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024 , पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांच्या उन्नतीसाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे, ज्ञानेश्वर खरात.
सरकार आणि संस्थांच्या पाठिंब्याने अपंगांचे कल्याण आणि पुनर्वसन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. या गरजू समुदायाला कुबड्या, तीनचाकी यांसारखे आवश्यक संसाधने देऊ केली. त्यांचे कार्य एवढ्यावरच थांबत नाही. अभ्यासपूर्ण प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, त्यांनी अंधश्रद्धेशी लढा देत चांगल्या भविष्यासाठी समाजभान जागृत केले. तसेच 2019 मध्ये, तिहेरी तलाक पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी, पीडितेच्या बाजूने उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिला. तसेच ज्ञानेश्वरांनी आपल्या जनजागृतीपर उपक्रमाच्या माध्यमातून, व्यसनमुक्ती सप्ताहादरम्यान, अनेक कुटुंबांना व्यसनाच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत केली.
काही विधवा महिलांना अनुकंपाखाली नोकरी मिळत नव्हती. त्यासाठी दि.१ जानेवारी २०१६ पासून पुणे महानगरपालिका कार्यालयासमोर अमरण उपोषण करून १५ वर्षे प्रलंबित असलेला ४६ जणांचा प्रश्न सोडविला ते आज नोकरी करीत आहेत. त्याचबरोबर सहलीपासून वंचित असलेल्या दिव्यांगांसाठी मोफत सहलींचे आयोजन त्यांनी केले आहे.
गरीबीमुळे लांबलेला, आर्थिक संघर्षामुळे लांबलेला, ग्रामस्थांच्या सहकार्यातून ऊस कामगारांचे लग्न लावून दिले. धार्मिक एकता जोपासण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन त्यांनी वेळोवेळी केले.
समाजात एकता, न्याय आणि समतेचे बंध विणणाऱ्या 'ज्ञानेश्वर खरात' यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान देताना खूप आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024 , पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
तीन दशकांहून अधिक काळ, सोमनाथ गवस यांनी महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. जलविज्ञान विभागात अथक परिश्रम करून, राज्यभरातील अनके प्रकल्प सुरळीतपणे कार्यान्वित केले.
धरण क्षेत्रातील असंघटित कामगारांना एकत्र करून कामगारांच्या हक्कांसाठी कायद्यांच्या मदतीने त्यांनी लढा दिला. सततची आंदोलने, मोर्चे आणि न्यायालयीन लढाई यातून त्यांनी एक लाखाहून अधिक हंगामी कामगारांना न्याय मिळवून दिला आणि त्यांचा रोजगार कायम केला. खऱ्या अर्थाने सोमनाथ गवस हे आवाजहीनांचा आवाज झाले आहेत. व्यसनी आणि निरक्षर कामगारांचे ते मार्गदर्शक झाले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अनेक कामगारांची मुले सध्या उच्च पदांवर पोहोचली आहेत.
2010 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोमनाथजींनी एक नवीन प्रवास सुरू केला. कोल्हापूरच्या दुर्गम चंदगड तालुक्यातील वृद्ध, विधवा आणि निराधार महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. 127 गावांमध्ये जेष्ठ नागरीक सेवा संघाची स्थापना केले. गांव तेथे जेष्ठ नागरिक, उंबरा तेथे जेष्ठ हे संपर्क अभियान त्यांनी राबविले. या माध्यमातून त्यांनी जेष्ठ नागरिकांना हक्क व फायद्याची जनजागृती केली.
कामगारांना एकत्र आणण्यापासून ते वृद्धांना सक्षम बनवण्यापर्यंतचा सोमनाथ गवस यांचा हा प्रवास परिवर्तनाचा दाखला आहे, असे म्हणायाल हरकत नाही.
सोमनाथ गवस यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान देताना खूप आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024 , पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
एक शांत संयमी आणि सखोल विचारांचा माणूस म्हणजे विनायक बोराळे ! सेवानिवृत्तीनंतर त्यांनी साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाबरोबर एक नवा प्रवास चालू केला. 2008 ते 2014 पर्यंत, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघात मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व केले. शिबिरे, अभ्यास वर्ग आणि आरोग्य मोहिमेचे आयोजन केले. त्यांच्या या कार्याने असंख्य लोकांना फायदा झाला.
गांधी आणि विनोबा भावे यांच्या पथदर्शी विचारांवर चालताना विनायक बोराळे यांनी त्यांचे विचार समाजात रुजवणे हे आपले ध्येय बनवले. त्यांनी उमरी, तालुका अकोला या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. त्यांच्यासाठी संस्कार केंद्र उघडले.
त्यांच्या प्रयत्नांमुळे आरोग्य शिबिरांपासून ते कथा, कविता वाचनापर्यंत असे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा आनंद घेतला. त्यांच्या निःस्वार्थ कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणला हाच आहे. त्यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही.
समाजासाठी अथक परिश्रम घेणारे, गांधीवादी विनायक बोराळे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान देताना खूप आनंद होत आहे.



