- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
ज्ञानदानातून समाज घडवणं आणि आयुष्य पणाला लावून शोषितांच्या न्यायासाठी लढणं... हा अखंड प्रवास म्हणजेच प्राध्यापिका वृषाली अजित मगदूम!
२० ऑक्टोबर १९५३ रोजी जन्मलेल्या वृषाली मगदूम यांनी एम.ए., एम.फिल.पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले. मात्र, केवळ वर्गाच्या चार भिंतींपुरते त्यांचे कार्य मर्यादित राहिले नाही; अध्यापनासोबतच समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक ही त्यांची जीवननिष्ठा बनली.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील सुमारे एक हजार कचरावेचक महिलांचे संघटन उभारून, वृषाली मगदूम यांनी या उपेक्षित घटकाला रोजगार आणि जगण्याचा खरा सन्मान मिळवून दिला. पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत, त्यांनी न्यायाचा प्रदीर्घ लढा दिला. मागील २६ वर्षांपासून 'लिंगनिवड प्रतिबंध समिती'त सक्रिय राहत, त्यांनी अनेक सोनोग्राफी केंद्रांच्या तपासण्या आणि धाडसी स्टिंग ऑपरेशन्समध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंध समितीतही त्यांनी अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार भूमिका बजावली.
सेवानिवृत्तीनंतर स्वतःला पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेत वृषाली मगदूम यांनी गरिबी, अंधश्रद्धा, बालविवाह, व्यसन आणि अनारोग्य अशा अनेक प्रश्नांवर थेट घाव घातला. सुमारे २७० महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी केले, तर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक भगिनींना पुन्हा दहावीच्या प्रवाहात आणले. त्यांनी सुरू केलेल्या आठ अभ्यासवर्गांमधून आज जवळपास ३९० वंचित मुले शिक्षणाची नवी पहाट अनुभवत आहेत. याशिवाय कुमारिका मातांचे पुनर्वसन आणि हुंडाबळी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे ठरले.
विचार आणि लेखनाची ताकद जोडत त्यांनी सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेचा विचार विविध व्याख्याने, कार्यशाळा, वृत्तपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला. प्रत्यक्ष सामाजिक लढ्यातून आलेल्या अनुभवांवर त्यांनी १३ हून अधिक पुस्तकांचे समृद्ध लेखनही केले. या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना संयुक्त राष्ट्रांचा प्रतिष्ठित 'लाडली पुरस्कार', रयत शिक्षण संस्थेचा 'लक्ष्मीबाई-भाऊराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार', 'स्त्री शक्ती सन्मान', 'समाजरत्न', 'नवदुर्गा' आणि 'शिक्षक रत्न' अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अध्यापन आणि अविरत सामाजिक लढ्याचा हा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या प्राध्यापिका वृषाली अजित मगदू यांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
१ मार्च १९५८ रोजी जन्मलेल्या सौ. भागीरथी मारोतराव बच्चेवार... शिक्षण क्षेत्रापासून समाजकार्यापर्यंत निस्वार्थ सेवेचा अखंड दीप तेवत ठेवणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व!
एम.ए., बी.एड. पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी सिडको, नांदेड येथील इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून प्रदीर्घ काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. निवृत्तीनंतर केवळ विश्रांती न निवडता, सेवेचा हा वसा त्यांनी अधिक जोमाने पुढे नेला. अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेतच; शिवाय स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या कार्यकारिणी अध्यक्षा, भारत स्काऊट आणि गाईडच्या जिल्हा आयुक्त, ग्राहक पंचायतीच्या अशासकीय सदस्य, जिल्हा पोलीस कार्यालयातील कौटुंबिक कलह निवारण समितीच्या सदस्या, आणि सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या अध्यक्षा अशा अनेकविध जबाबदाऱ्या त्या तितक्याच समर्थपणे सांभाळत आहेत.
‘जिच्या हाती महिला ज्येष्ठ नागरिकांचे सूत्र, ती करी विश्वाला पवित्र’ या विचाराने प्रेरित होऊन भागीरथीताईंनी ज्येष्ठांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश आणला. त्यांच्या पुढाकाराने तब्बल ४०० महिलांना 'आयुष्मान भारत' आरोग्य कार्डे, तर १२ ते ९० वयोगटातील ७०० महिलांना विरंगुळा केंद्राची कार्डे मिळवून दिली गेली. महिलांसाठी साक्षरता वर्ग, आरोग्य व कॅन्सर तपासणी शिबिरे, रक्तदान मोहीम असो वा कोविड काळातील अन्नधान्य व मास्क वाटप—प्रत्येक संकटात त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
ज्येष्ठांना पेन्शन, ओळखपत्र, कायदेशीर संरक्षण आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यापासून ते अगदी बँकेच्या कामांपर्यंत, प्रत्येक गरजू ज्येष्ठासाठी त्या स्वतः पुढे धावून जातात. त्यांच्या या अतुलनीय सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना जिल्हा परिषद पुरस्कार, सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार, नांदेड भूषण, रयतेचा कैवारी आणि नवनीत पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अशा या संवेदनशील, समर्पित आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आधारवड ठरलेल्या सौ. भागीरथी मारोतराव बच्चेवार यांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
२७ जानेवारी १९५९... कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील ‘माले’ या गावी जन्मलेले एक सामान्य बालक. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताने दोन्ही पाय हिरावून घेतले. पण नियतीने आखून दिलेल्या या सीमारेषेला आव्हान देत, वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच सुरू झाला एका असामान्य लढवय्याचा संघर्ष... नाव— मानव श्रीपती कांबळे!
शरीराची मर्यादा मनाच्या उत्तुंग भरारीला कधीच अडवू शकली नाही. एम.कॉम.पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण करत, मानव कांबळे यांनी एलपीजी वितरणाचा व्यवसाय उभा केला आणि स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला. विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध पेटून उठत त्यांनी विद्यार्थ्यांचे भक्कम संघटन उभारले आणि अनेक आंदोलने यशस्वी करून दाखवली. शेतकरी असोत वा कष्टकरी कामगार, हातगाडी-रिक्षाचालक, असंघटित कामगार किंवा घरकाम करणाऱ्या महिला... वंचित-उपेक्षितांच्या प्रत्येक हाकेला मानव कांबळे हेच पहिले उत्तर ठरले. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, बाबा आढाव, भाई वैद्य, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि मेधा पाटकर अशा दिग्गज विचारवंतांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक, धरणग्रस्त आणि सेझविरोधी आंदोलनांचे रणांगण गाजवले.
स्वतः दिव्यांगाचे दुःख सोसल्यामुळे त्यांनी इतर दिव्यांगांच्या आयुष्यात उजेड पेरण्याचा वसा घेतला. आजवर ३ हजारांहून अधिक दिव्यांग तरुणांच्या पुनर्वसनात मानव कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्यभर शेकडो व्याख्याने दिली, सामाजिक विषयांवर १०० हून अधिक अभ्यासपूर्ण लेख लिहिले आणि ‘जनगणमन’ या आत्मचरित्रातून आपला संघर्षमय प्रवास शब्दांकित केला. आज स्वराज अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्राचे कार्याध्यक्ष म्हणून ते अविरत कार्यरत आहेत. राजर्षी शाहू पुरस्कार, एस.एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण अशा अडीचशेहून अधिक पुरस्कारांनी मानव कांबळे यांच्या सेवाव्रताचा सन्मान झाला आहे.
अपघाताच्या काळोखातून उभे राहून हजारो उपेक्षितांच्या जगण्याला प्रकाश देणारी अफाट जिद्द, अभेद्य चिकाटी आणि समतेचा अखंड जागर करणारे कर्मयोगी मानव कांबळे यांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
स्वातंत्र्याची नवी पहाट अनुभवणाऱ्या भारतात, ५ ऑगस्ट १९५० रोजी एका समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला— बबन हौसाजीराव पाटणकर. स्वातंत्र्योत्तर काळात घडणाऱ्या सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनाच्या विचारांची खोल छाप त्यांच्या मनावर बालपणापासूनच उमटली.
शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘जाम मिल लिमिटेड’ या नामांकित कंपनीत दीर्घकाळ कर्तव्यदक्ष सेवा दिली. २००६ मध्ये सेवानिवृत्तीनंतर खरी समाजसेवेची नवी इनिंग सुरू झाली. वयाच्या ६१ व्या वर्षी, बहुतांश लोक विश्रांतीची वाट निवडतात; मात्र बबनरावांनी आपले उर्वरित आयुष्य ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा दृढ संकल्प केला. केवळ भावना नव्हे, तर शाश्वत दृष्टिकोन हवा या विचाराने त्यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये प्रतिष्ठित ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (TISS) येथून ज्येष्ठांच्या समस्या, मानसिक-शारीरिक आरोग्य आणि सन्मानपूर्ण जीवनशैलीचे रीतसर प्रशिक्षण पूर्ण केले.
१ मे २०१९— महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांनी स्थापन केली ‘सिनिअर सिटीजन हेल्थकेअर फाउंडेशन.’ ज्येष्ठ नागरिकांना हक्काची हसण्या-बोलण्याची जागा मिळावी म्हणून त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे सलग ५ वर्षे अथक पाठपुरावा केला आणि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ज्येष्ठांसाठी हक्काचे विरंगुळा केंद्र प्रत्यक्षात उभे राहिले.
आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे पाऊल उचलले. ‘इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’च्या सहकार्याने तब्बल १ हजारांहून अधिक ज्येष्ठांना ‘हेल्थ कार्ड’ वितरित करून तपासणी व उपचारांवर १५ टक्के सवलत मिळवून दिली. ज्येष्ठांच्या सोबतीने उद्यान संवर्धन आणि अविरत वृक्षारोपण करत पर्यावरणाशी नातं घट्ट विणलं. इतकेच नव्हे, तर ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या विचारानुसार स्वतः मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.
ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली अपार संवेदनशीलता, अविरत ऊर्जा आणि निस्वार्थ योगदानाचे प्रतिक श्री. बबन हौसाजीराव पाटणकर यांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
मराठवाड्याच्या राकट आणि कणखर मातीत आनंदाची बाग फुलवण्याची जिद्द रुजलेली आहे... याच प्रेरणेतून, ४ मे १९५७ रोजी एका संवेदनशील आणि ध्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा उदय झाला — नाव, प्रकाश भगवानराव घादगिने!
जिद्द, संवेदनशीलता आणि समाजाप्रती अथांग निष्ठा हीच प्रकाश भगवानराव घादगिने यांच्या आयुष्याची खरी ओळख ठरली. एस.एस.सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रतिमिनिट १०० शब्दांच्या वेगाने स्टेनोग्राफीचे कौशल्य आत्मसात करत प्रकाश घादगिने पाटबंधारे विभागात रुजू झाले. ३१ मे २०१५ रोजी लातूर पाटबंधारे विभागातून 'सहाय्यक आरेखक' पदावरून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी आपल्या आयुष्याची नवी इनिंग पूर्णपणे समाजकार्यासाठी समर्पित केली. चित्रकला, व्यंगचित्रकला, काव्य, कथाकथन आणि संगीत अशा विविध कलांचा वरदहस्त लाभलेल्या प्रकाश घादगिने यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला आपले सर्वस्व मानले.
बुवाबाजी, तंत्र-मंत्र, भानामती आणि फलज्योतिष यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध प्रखर जनजागृती निर्माण करत, प्रकाश घादगिने यांनी तब्बल ६५ हून अधिक कार्यशाळा, शिबिरे आणि व्याख्याने घेतली. सुमारे ९० हजार विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध आणि स्वयंअध्ययनाची दिशा दाखवली, तर ३०० हून अधिक आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि सत्यशोधकी विवाहांची मुहूर्तमेढ रोवत समाजात समतेचा विचार दृढ केला.
गेल्या १९ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत. कलेच्या प्रांतातही प्रकाश घादगिने यांचा ठसा तितकाच गडद आहे... गेल्या २५ वर्षांपासून 'दैनिक एकमत'चे लोकप्रिय पॉकेट कार्टूनिस्ट म्हणून त्यांची कुंचल्याची जादू अविरत सुरू आहे. दरवर्षी ९५ ते १०० दिवाळी अंकांत त्यांची व्यंगचित्रे झळकतात, तर २६० हून अधिक पुस्तकांची देखणी मुखपृष्ठे प्रकाश घादगिने यांनी साकारली आहेत.
समाजातील प्रत्येकाला आधार देण्याचा वसा जपत, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी सुमारे ७५ लाख रुपयांची सुसज्ज विरंगुळा केंद्राची देखणी वास्तू प्रकाश घादगिने यांनी उभी केली. शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जात १ लाख ६१ हजारांची थेट मदत दिली, तर गेल्या पाच वर्षांत समाजकार्यासाठी तब्बल ९ लाख रुपयांचा निधी उभारून मदतीचा ओघ सुरू ठेवला. 'महाराणा प्रताप हिंदवी सूर्य', 'साहित्य भूषण', 'आधारस्तंभ', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण' आणि 'ग्रंथमित्र' यांसारख्या ३७ हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
कलेची साधना, प्रबोधनाचा ध्यास आणि निस्वार्थी समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या प्रकाश भगवानराव घादगिने यांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



