
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माहुली किल्ला परिसरातील २०-२५ खेड्यातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन १ ऑक्टोबर २०११ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. त्याचं नाव "ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद व परिसर – ठाणे" ! आजच्या घडीला जवळपास ८८७ आजीव सभासद आहेत. आणि अधोरेखित करावी अशी गोष्ट म्हणजे ५९० महिला सदस्य आहेत. वेळोवेळी मासिक सभा घेऊन ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
आनंद मेळावा, महिला मेळावा, आरोग्य मेळावा सातत्याने राबविण्याचा त्यांचा संकल्प असतो. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते. गेल्या पाच वर्षात एकूण २० सहली निघाल्या असून त्यात ज्येष्ठांनी भरपूर आनंद लुटला आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून शहरातून जनजागृतीपर प्रभातफेरी काढली जाते तसेच सामाजिक बांधिलकी शपथ घेतली जाते. तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. ज्येष्ठांच्या स्मरणशक्ती वाढीसाठी विविध खेळांचे आयोजन देखील केले जाते.
"जीवन सुंदर आहे - जगा आणि जगवा" या ध्येयवाक्यावर त्यांचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो, या सदिच्छा.
आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
जळगावमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आशेचा किरण म्हणजे चैतन्यनगर, ज्येष्ठ नागरिक संघ ! ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी हा संघ आघाडीवर आहे. शून्यातून सुरवात झालेल्या या संघाची सभासद संख्या आता १६८ वर पोहोचली आहे. प्रेम, काळजी आणि मायेने वाढणारे हे एक छोटेसे कुटुंबच !
प्रत्येक महिन्याच्या शेवटी वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार, राष्ट्रीय योग दिनानिमीत्त योग प्रशिक्षण शिबीर, बॉडी चेक-अप शिबीर तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जेष्ठांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे देखील आयोजन या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत केले जाते.
सण, परंपरा जोपासण्यात हा संघ आघाडीवर आहे. गुढीपाडवा, दिवाळी अशा सणांच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेणेकरून सर्व ज्येष्ठ मंडळींचा आनंदात विरंगुळा व्हावा. ज्येष्ठ महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम देखील घेतला जातो.
दयाळूपणा, संस्कृती आणि काळजी या त्रिसूत्रीवर हा ज्येष्ठ नागरिक संघ उभा आहे. म्हातारपणातील सुवर्ण वर्षांसाठी हा संघ एक आधारस्तंभ आहे. अनेक ज्येष्ठांचा सोबती हा संघ आहे, अनेक ज्येष्ठांचा खांदा हा संघ आहे. अजून अनेकांना आधार देणे बाकी आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून उत्तरोतर अनेक सामाजिक काम घडो, या सदिच्छा !
चैतन्यनगर, ज्येष्ठ नागरिक संघ, जळगाव यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: राज्यस्तरीय पुरस्कार
लातूर येथील पंचवीस वर्षांपासून हा संघ ज्येष्ठांसाठी अथकपणे कार्यरत आहे. पूर्वी या ज्येष्ठ नागरिक संघाचे १२५ ते १५० सभासदांची संख्या होती परंतु, आज साडेतीनशेपेक्षा अधिक सदस्यांपर्यंत विस्तारली आहे.
निष्ठावान व रसिक सदस्यांसाठी कवी संमेलन, कथाकथन, संगीत आणि नाटक स्पर्धा आयोजित करून त्यांनी ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव दिला आहे. ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांसाठी अमृत महोत्सव, तर ८१ वर्षांसाठी सहस्रचंद्र दर्शन आणि जीवनगौरव पुरस्कार – हे कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवले जात आहेत.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३४ वे राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन, साडेतीन हजार ज्येष्ठांना एकत्र आणले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून मिळालेल्या दोन लाख अनुदानातून ज्येष्ठांसाठी पहिले साहित्य संमेलन यशस्वी केले. गेल्या चार वर्षांत कार्यक्रमांद्वारे ९ लाख रुपये एफडी स्वरूपात जमा करून संघाची आर्थिक बळकटी वाढवली आहे.
या संघामार्फत नेत्रदान, देहदान याविषयी जनजागृतीपर व्याख्याने आयोजित केली जातात. भविष्यात ज्येष्ठांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ, लातूर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.