- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार, District: सातारा
विठ्ठल खिलारी यांचा माण तालुक्यातल्या पानवनच्या मातीत जन्म... आणि शेनवडीच्या वस्तीशाळेत त्यांनी गिरवलेली पहिली अक्षरं! पण शिक्षण म्हणजे काय असतं, हे पुस्तकांपेक्षा गरिबीच्या चटक्यांनीच त्यांना जास्त शिकवलं. अवघ्या चौथीत असताना आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला निघाले. दसरा ते पाडवा, तब्बल सहा महिने आई-बापाची ताटातूट आणि शेजाऱ्यांच्या घरात बालपणाचा मुक्काम असायचा.
पंधरा दिवसांतून जेमतेम दोन दिवस शाळा. पहाटे चारच्या बोचऱ्या थंडीत पाण्यासाठी नळावर लावलेला नंबर, जनावरांचं शेण, पाणी तापवणं आणि दिवसभर शिलाई मशीनवर कपड्यांना हातशिलाई अन् बटणं लावणं... बालपण असंच राबून संपत होतं. पण याच अंधारात एका पौर्णिमा बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओने प्रकाश आणला! पहाटे पावणेसहा ते रात्री बारा... रेडिओवर चाललेलं ‘चितेवरच्या कळ्या’ कादंबरीचं क्रमशः वाचन त्यांच्या कानावर पडलं, आणि दुष्काळी मातीत एका भावी लेखकाची पाळंमुळं रुजली. पुढे साताऱ्याचं रयत शिक्षण संस्थेचं छत्रपती शिवाजी कॉलेज... तिथे ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षणाचा लढा सुरू झाला. डी.एड., बी.ए. आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनात राहून घेतलेले एम.ए.चे शिक्षण. हाताला काम आणि ओठावर विद्येचा ध्यास! या अथांग परिश्रमांचं फळ मिळालं, २०१८ मध्ये ‘SET’ परीक्षा उत्तीर्ण होऊन, २०१९ पासून झरे येथील पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
पण लेखणीला खरी धार दिली ती आईच्या बलिदानाने! २०१० मध्ये आई वारली... मुलाच्या शिक्षणासाठी जिने आयुष्यभर गळ्यातलं डोरलं सोनाराकडे गहाण ठेवलं, शेवटी तिच्या तोंडात घालायला सोन्याचा मणीही शिल्लक नव्हता! त्या अंतहीन दुःखातून, रात्रीच्या तळमळीतून जन्मली कथा—‘डोरलं’. ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सरांच्या शब्दांनी दिशा दिली, आणि आई-वडिलांच्या घामाचं, ऊसतोड कामगारांच्या वेदनेचं अस्सल वास्तव मांडणारी ‘सवळा’ ही कादंबरी जन्माला आली. २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीने मराठी साहित्यविश्वात ठसठशीत ठसा उमटवला.
गोठ्यातल्या शेणापासून सुरू झालेला प्रवास आज एका प्राध्यापकापर्यंत आणि एका संवेदनशील लेखकापर्यंत पोहोचला आहे. मातीशी आणि माणसांशी नाळ जोडलेले लेखक प्रा. विठ्ठल खिलारी यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फौंडेशनचा 'ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार, District: चंद्रपूर
एकेकाळी पाटलांच्या वाड्यात समृद्धी नांदत होती. पण नियतीचा घाव बसला... वडिलांचे छत्र हरपले, आणि घरादारावर अभावाची काळी सावली दाटली. चार भावंडांतल्या एकुलत्या एका मुलाला शिकवण्यासाठी आईने स्वतःचे अश्रू डोळ्यांतच जिरवले... दुसऱ्यांच्या घरात, हॉटेलांत भांडी घासून मुलाच्या पंखांत शिक्षणाचं बळ भरलं!
सरदार पटेल महाविद्यालयातून बी.ए., एम.ए. आणि नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.फिल.! विद्यापीठ सचिव आणि एक धारदार राज्यस्तरीय वादविवादपटू म्हणून श्रीकांत यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण नियतीची परीक्षा अजून संपली नव्हती. आजोबा, आजी, सख्खा भाऊ... आणि हुंड्याच्या आगीत होरपळलेली लाडकी बहीण! एकापाठोपाठ बसलेल्या या आघातांनी मन पुरतं छिन्नविच्छिन्न झालं. पण, जगण्याची जिद्द अजून संपली नव्हती. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असतानाच तरुणाईसमोर आ वासून उभी राहिली सरकारी भरतीची मंदी. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून श्रीकांत साव रस्त्यावर उतरले. २०१३ ते २०१८ सुशिक्षित बेरोजगारांचे महामोर्चे चालू होते! रस्त्यावरून उठणारा हा आक्रोश त्यांनी गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत गाजवला... लाखो हातांना हक्काचा आवाज दिला.
त्यानंतर आला कोरोनाचा जीवघेणा काळ... दोन-दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून ते परत आले. बंद पडलेली अकॅडमी आणि आतल्या आत उसळणारं अस्वस्थतेचं वादळ! अशा अंधाऱ्या वळणावर ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर यांचे शब्द संजीवनी ठरले— "जे मनात दाटून आलंय, ते थेट कागदावर उतरव!"
आणि... दुःखाच्या राखेतून शब्दांची नवी पालवी फुटली! अश्रूंची शाई झाली आणि जन्माला आला एक जळजळीत दस्तऐवज— 'अभोगी रोजगाराचा हंगाम'! साहित्य अकादमी विजेते श्रीकांत देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या दिग्गजांनीही ज्या लेखनाचे कौतुक केले, त्या शब्दांनी व्यवस्थेने नाकारलेल्या उपेक्षितांच्या वेदनेला थेट आवाज दिला.
आईच्या कष्टांचं पवित्र देणं, संघर्षाची जाणीव आणि मातीशी घट्ट जोडलेली नाळ... ज्यांच्या लेखनात केवळ शब्द नाहीत, तर जळत्या वास्तवाची जिवंत साक्ष आहे; अशा संवेदनशील कवी, झुंजार लढवय्या श्रीकांत साव यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फौंडेशनचा 'ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार, District: बुलढाणा
एका हातात विज्ञानाचा प्रकाश आणि दुसऱ्या हातात कवितेचं अलवार संवेदन! दोन परस्परविरोधी वाटा; पण जेव्हा त्या एकाच ध्यासात मिसळतात, तेव्हा आकारास येतो एक उत्तुंग प्रतिभावंत! विज्ञानाचं कठोर तर्कशास्त्र आणि मनाची संवेदनशील अभिव्यक्ती यांचा एक सुरेख, सहज संगम म्हणजेच — प्राध्यापक प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी!
अमरावती विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून, आज ते बुलढाण्याच्या भारत विद्यालयातून नव्या पिढीला भौतिकशास्त्राचे धडे देत आहेत. पण केवळ अध्यापनाच्या चौकटीत त्यांचं भावविश्व कधीच बंदिस्त राहिलं नाही. त्यांच्या अंतर्मनात सर्जनशीलतेचा एक अखंड झरा वाहत राहिला. विविध नियतकालिकांतून उमटत गेलेल्या त्यांच्या अस्सल शब्दांनी अल्पावधीतच मराठी काव्यविश्वात आपली एक ठळक आणि स्वतंत्र नाममुद्रा उमटवली. आणि याच प्रदीर्घ काव्यसाधनेतून साकारला त्यांचा पहिलाच संग्रह — ‘विस्मरणाच्या अरण्यात’... माणसाच्या गहिऱ्या भावभावनांचा तळ शोधणाऱ्या या संग्रहाने अवघ्या मराठी साहित्यविश्वाचं लक्ष वेधून घेतलं, आणि विदर्भाच्या समृद्ध साहित्य परंपरेला दिली एक नवी झळाळी! पहिल्याच काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मान लाभणे, ही मराठी साहित्यातील अत्यंत दुर्मीळ आणि ऐतिहासिक घटना ठरली!
सोलापूरचा ‘लोकमंगल’, नाशिकचा ‘विशाखा’, विदर्भ साहित्य संघाचा ‘कविवर्य ग्रेस’ आणि पुण्याचा अत्यंत मानाचा ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ त्यांना मिळाले. या सर्वच व्यासपीठांवर त्यांनी आपल्या सकस प्रतिभेची मोहोर उमटवली. विज्ञानाची दृष्टी आणि शब्दांची समृद्ध पालवी जपणारे व्यासंगी कवी — प्रा. प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फौंडेशनचा 'ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: साहित्य पुरस्कार, District: मुंबई
आपल्या नावामध्ये वडिलांच्या बरोबरीने आईच्या अस्तित्वाचाही सन्मान जपणारे व्यक्तिमत्त्व… म्हणजेच अविनाश उषा वसंत!
जन्म गिरणगावच्या चाळीतला. वडील सहकार चळवळीतले; त्यामुळे घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबांच्या गाथेचे नित्य रसग्रहण चालायचे. वडिलांकडून मिळालेला हाच वाचनाचा समृद्ध वारसा, पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानाही अविनाश यांनी तितक्याच निष्ठेने जपला. गिरणगावावरचे अपार प्रेम आणि अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गिरणगावावर संशोधन सुरू झाले, पुढे त्यावरच ‘पीएचडी’ झाली आणि कामगार चळवळीच्या नाडीचे एक खोल, विस्तृत आकलन त्यांना लाभले. याच आकलनातून जन्माला आली— त्यांची पहिली लक्षवेधी कादंबरी, 'पटेली'!
१९८२ च्या ऐतिहासिक संपानंतर गिरण्यांचे भोंगे थंडावले, चाळींची जागा टॉवर्सनी घेतली; पण तिथल्या माणसांचं काय झालं? महानगराच्या गर्दीत चिरडला जाणारा तरुण, त्याचा वर्गसंघर्ष आणि अस्तित्व शोधताना वाट्याला आलेला एकाकीपणा… अविनाश यांनी अत्यंत भेदक वास्तववादी शैलीत मांडला. या कादंबरीला राज्य शासनाचा मानाचा ‘श्री. ना. पेंडसे पुरस्कार’ लाभला. केवळ लेखन नाही, तर साहित्याच्या माध्यमातून व्यवस्थेत हस्तक्षेप झाला पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका राहिली. म्हणूनच पुस्तक मांडणी, कव्हर डिझाईन आणि वितरणात त्यांनी नवे प्रयोग केले. 'कविता ह्या हिणवलेल्या' या संग्रहातून व्यक्त होणारा विद्रोही सूर असो, वा संकटांच्या डोळ्यात डोळे भिडवून हक्कासाठी उभ्या राहणाऱ्या पात्रांचा थरार मांडणारी 'ठसन' कादंबरी असो… अविनाश यांच्या लेखणीने मराठी साहित्याला वास्तववादाचा एक नवा, धारदार चेहरा दिला.
तळागाळातील वेदना शब्दांत पकडणारा संवेदनशील कवी, निर्भीड विचारवंत आणि मराठी साहित्यात ठसक्यात वावरणारा एक सशक्त तरुण “अविनाश उषा वसंत” यांना, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशनचा 'ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2026, पुरस्कार प्रकार: शेती-पाणी पुरस्कार, District: जालना
संकटांनी घेरलं की माणूस खचतो, पण काहींची जिद्द अशा संकटांवर मात करून यशाची नवी वाट तयार करते. ही गोष्ट आहे अशाच एका कणखर मातीतील ध्येयवेड्या स्त्रीची त्या म्हणजे सीमा सदानंद क्षीरसागर!
जालना जिल्ह्यातील कडवंची गावच्या सीमाताई. २०१८ साल त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी देऊन गेलं. पती सदानंद यांच्या किडनीच्या गंभीर आजारपणाने घराचा आधार कोसळला. अखेर २०२० मध्ये सासरे विनायकराव क्षीरसागर यांनी स्वतःची एक किडनी आपल्या मुलाला दान केली आणि किडनी प्रत्यारोपण यशस्वी झालं. पतीवर आलेल्या आजारपणामुळे कष्टाची कामं करणं अशक्य झालं, पण सीमाताई खचल्या नाहीत. परिस्थितीसमोर हात टेकण्याऐवजी त्यांनी शेतीची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. आपल्या चार एकर शेतात त्यांनी परिश्रमाची हिरवीगार स्वप्नं फुलवली. दोन एकरात डौलानं बहरणारी द्राक्षांची बाग, एक एकरात लालचुटुक डाळिंब, शेततळं आणि उर्वरित भागात कापूस तसंच चारा पिकांचं काटेकोर नियोजन त्यांनी केले.
फक्त देखरेख नाही, तर शेतीची प्रत्येक बारीक-मोठी कामं त्या स्वतः करतात. झाडांची छाटणी असो, वॉटर सोल्युबल खतांचं व्यवस्थापन असो, औषधांची फवारणी असो वा पाण्याची घडी बसवणं असो... इतकंच नव्हे, तर शेतात रोटावेटर, मोगडा आणि वखर चालवण्यासारखी कष्टाची कामंही त्या तितक्याच लीलया सांभाळतात. घरात सासरे विनायकराव, पती सदानंद आणि आरुष व वेद ही दोन गोड मुलं... या संपूर्ण कुटुंबाची मायेची सावली म्हणजे सीमाताई. शेतातील घामाच्या धारांसोबतच संसाराची घडी बसवताना, फावल्या वेळेत त्या शिवणकामही करतात. यासोबतच गावातील ‘राजे संभाजी महिला स्वयंसहायता बचत गटा’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा भाग झाल्या आहेत.
संकटांवर मात करत जिद्दीनं उभी राहिलेली शेती, सावरलेलं कुटुंब आणि आत्मनिर्भरतेचं एक प्रेरणादायी उदाहरण असलेल्या सीमा क्षीरसागर यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फौंडेशनचा 'ना. धो. महानोर शेती-पाणी पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.



