- Awards Content:
- वर्ष: 2025, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजिका सन्मान, District: पुणे
कमल कुंभार या धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात ७० रुपये मजुरीवर काम करायच्या. १९९९ मध्ये त्यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून एक नवी सुरुवात केली. त्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेतीसह दहा विविध व्यवसाय सुरू केले. यातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आणि इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल २१ लाख रुपये असून, त्यातून त्या उत्तम कमाई करत आहेत.
कमल यांनी बांगडी विक्री, स्टेशनरी, साडी व्यवसाय, मेस, लाईट बिल वाटप, सोलार डी-लाइट असे विविध व्यवसाय केले. बचत गटांचे मेळावे, प्रशिक्षण आणि दौरे यातून त्यांनी स्वतःसह इतर महिलांना सक्षम केले. त्यांनी भाड्याने शेती घेऊन एक एकरावर व्यवसायाचे मॉडेल उभे केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे आतापर्यंत अनेक महिलांना उद्योजिका बनवण्यात त्यांनी मदत केली, आणि भविष्यात दहा हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लक्ष्मी किसान, नारीशक्ती , नीती आयोग , युएनडीपी, फिक्की आणि राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. कमल यांची इच्छा आहे की, देशभरातील व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास विद्यापीठ स्थापन व्हावे. त्यामुळे मुली व महिलांना उद्योग- व्यवसाय उभा करण्यासाठी प्रेरणा, प्रशिक्षण व पूरक वातावरण लाभेल.
स्वतःसह शेकडो महिलांना सशक्त करणाऱ्या कमल कुंभार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: २०२५ , पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान, District: पुणे
अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील खेड्यात जन्मलेल्या शबनम यांनी क्रीडा या प्रकारात महिलांची कुस्ती या विषयात पीएच.डी. पूर्ण करणाऱ्या त्या भारतातील सर्वात तरुण भारतीय महिला म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्या भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक आहेत आणि कुस्ती खेळात पारंगत आहेत.
पदक तालिकेत त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला कुस्तीपटूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. २०२३ मध्ये जॉर्डन येथे झालेल्या अंडर- ट्वेंटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने प्रथमच पदके जिंकली. अल्बानिया येथे अंडर-२३ स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य, तीन कांस्य, तर २०२१ मध्ये सर्बियात एक रौप्य, चार कांस्य पदके मिळाली. २०१९ मध्ये बल्गेरियात कॅडेट स्पर्धेत दोन सुवर्ण, एक कांस्य, तर २०१८ मध्ये उझबेकिस्तानात आशियाई कॅडेट स्पर्धेत सात पदके मिळाली. २०२२ मध्ये फ्रान्समधील जिम्नासियाड स्पर्धेत एक कांस्य आणि २०२३ मध्ये दिल्लीत राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावले.
शबनम यांचा विश्वास आहे की, क्रीडामधील महिलांचा सहभाग हा समानता, नेतृत्व कौशल्य आणि महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाचा आहे. मैदानी खेळ मुलींचा आत्मविश्वास, शारीरिक-मानसिक बळ व आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक प्रगती वाढवतात. खेळाडूंना ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणे, हे त्यांचे ध्येय आहे.
खऱ्या अर्थाने महिला कुस्तीला नवी उंची देणाऱ्या शबनम शेख यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: २०२५ , पुरस्कार प्रकार: यशस्विनी साहित्य सन्मान, District: पुणे
डॉ. श्यामल यांचा जन्म ६ जुलै १९७० रोजी औरंगाबाद, म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजीनगर येथे झाला. त्यांचे वडील प्रा. मनोहर गरुड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून ते अनेक सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहिले. आई मालतीबाई गांगुर्डे-गरुड या शिक्षिका होत्या आणि त्यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार श्यामल यांच्यासह आपल्या तिन्ही मुलांमध्ये रुजवला.
डॉ. श्यामल यांनी औरंगाबाद येथे मराठीत एम.ए., नेट, पीएच. डी. आणि पत्रकारितेत पदवी प्राप्त तसेच २००१ मध्ये त्या मुंबईच्या महात्मा फुले रात्र महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य होत्या. तिथे त्यांनी गिरणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. २०१३ पासून त्या मुंबई विद्यापीठात मराठीच्या अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी ‘दलित स्त्री आत्मकथने, कलाजीवन ‘ती’च्या अंत:स्थाचं, कनातीच्या मागे, टूटती खामोशियां, आंबेडकरी आई, तमाशातील बहुजन कलावंताचे योगदान : वारसा आणि सद्य:स्थिती ‘दलित स्त्री आत्मकथने’ ही त्यांची साहित्य संपदा आहे. विशेषतः तमाशा या लोककलेच्या पडद्यामागील कलावंत, गौळण गायिका, चित्रकार, तमाशाच्या डोलारा सांभाळणारे व्यवस्थापक यांच्या जीवनाच्या नोंदी त्यांनी संशोधनातून जिवंत केल्या. त्यांच्या या संशोधनामुळे लोककलेच्या अभ्यासात मोलाची भर पडली आहे. वंचित उपेक्षितांच जीवन त्यांच्या लेखणीतून प्रभावीपणे समाजासमोर मांडल गेल.
आपल्या संशोधनपर साहित्यातून लोककलावंतांना इतिहासाच्या पानावर जिवंत ठेवणाऱ्या डॉक्टर श्यामल गरुड यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी साहित्य सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजिका सन्मान, District: पुणे
लग्न झालेले होते. इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झालेले होते. सुशिक्षित असून देखील बेरोजगारीचे आयुष्य राजश्री ताई गावाकडे जगत होत्या. समोर कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्यांच्या पतीला नोकरीसाठी भोसरी, पुणे येथून बोलावणे आले आणि आशा पल्लवित झाल्या. त्यांच्या पतीने काही काल नोकरी केली व त्यानंतर स्वत:चा व्यवसाय उभा केला. भोसरी सारख्या उद्योग नगरीमध्ये बायकांचे संघटन करून लघुउद्योजक महिला बचत गट स्थापन केला. संसार सांभाळत पतीच्या व्यवसायात देखील त्या मदत करू लागल्या. परंतु स्वत:चे अस्तित्व काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
अशातच एक जर्मन व्यवस्थापन असलेली आजारी कंपनी हस्तांतरित करण्याची संधी उपलब्ध झाली. आशिया खंडातील चुंबक बनविणारी पहिली कंपनी ‘म्याग्णालास्ट टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ राजश्री ताईंनी हाती घेतली. वर्षाला दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल आजच्या घडीला ही कंपनी करत आहे. जवळपास १२० पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. त्यामध्ये पन्नास टक्के महिला कामगार आहेत. एवढी संकटे येऊन देखील आजच्या घडीला एवढी मोठी कंपनी झाली आहे, याबद्दल तुमच्या काय भावना आहेत असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात, “स्वत:चा संसार सांभाळता सांभाळता कंपनीचा संसार देखील विस्तारत गेला. मी स्वत: तर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेच परंतु त्याचबरोबर अनेक महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, याचे मला समाधान आहे.”
महिला सक्षमीकरणासाठी २०१८ साली त्यांनी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. आज घडीला १८०० पेक्षा जास्त सदस्य या संस्थेचे आहेत.
त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जे आर डी टाटा उद्योग सखी पुरस्कार, दि प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार, सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
उद्योजिका राजश्री नागरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान, District: नाशिक
अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या अनेक व्यावसायिक क्षेत्रांकडे आजकालच्या मुलांचा ओढा आहे. क्रीडा क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने अजूनही विचार केला जात नाही. ग्रामीण भागात तर नाहीच नाही. नाशिक येथील रहिवासी श्रद्धा नलमवार यांनी डिफेन्स क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी होऊन देखील क्रीडा प्रकारातील रुची जोपासली. ‘शिक्षण हा नेहमीच माझ्या करिअरचा आधार राहिला आहे.’ असे त्यांचे म्हणणे आहे.
श्रद्धा ताई केवळ प्रशिक्षकच नाही तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या जज आणि प्रशिक्षकही आहेत. २०१३ पासून, श्रद्धाने विनर शूटिंग क्लब, क्रीडा प्रबोधिनी आणि SVJCT च्या स्पोर्ट्स अकादमीसह विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
श्रद्धा ताईंचे नेतृत्व कोचिंगच्या पलीकडे आहे. त्या मोनाली गोऱ्हे फाऊंडेशनच्या संचालिका, नाशिक येथील विनर शूटिंग क्लबच्या अध्यक्षा आणि नाशिकच्या जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटनेच्या सरचिटणीस आहेत.
श्रद्धा यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्या भारतीय नेमबाजी पथकाचा भाग होत्या तसेच त्यांनी राष्ट्रीय खेळ आणि चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. निष्णात शुटर अंजली भागवत या त्यांच्याच विद्यार्थिनी आहेत, हे आवर्जून नमूद करायला हवे.
श्रद्धा यांच्या सारख्या प्रशिक्षकांमुळे भारताच्या नेमबाजीचे भविष्य खूप चांगले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
श्रद्धा नलमवार यांच्या प्रशिक्षणामुळे आपल्या भारतासाठी अनेक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत या सदिच्छा. श्रद्धा नलमवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



