- Awards Content:
- वर्ष: 2022, पुरस्कार प्रकार: यशस्विनी उद्योजकता सन्मान, District: कोल्हापूर, Youtube Video:
उद्योग विश्वात अनेक महिलांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आपणही यापैकीच एक. आपली कहाणी जितकी प्रेरणादायी तितकीच अंगावर शहारे आणणारी! एकीकडे घरातला कर्ता माणूस अचानक निघून गेलेला आणि दुसरीकडे व्यवसायाचा डोलारा सांभाळण्याचे आव्हान. उद्योग-व्यवसायाशी किंचितही संबंध नसलेल्या आपण मोठ्या धीराने उभ्या राहिलात. पतीच्या निधनानंतर चौदाव्या दिवशी तुम्ही व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. माता पित्याची दुहेरी भूमिका सांभाळताना व्यावसायिकाची एक नवीन भूमिकाही आपण स्वीकारली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण व्यवसायातील बारकावे शिकून घेतले.
आजच्या घडीला महाडसारख्या शहरात आपल्या कंपनीची वार्षिक उलाढाल १० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 'महिलांना व्यवस्थापनाचे शिक्षण घरातच मिळते, परंतु त्या त्याचा योग्य त्या रीतीने वापर करत नाहीत. त्यांनी जर तसा वापर केला तर प्रत्येक महिला यशस्विनी होईल'. असं आपण नेहमी सांगत आलात. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणा या त्रिसुत्रीच्या जोरावर कठीण कालखंडातही आपण खंबीरपणे यशस्वी उद्योजक म्हणून उभ्या ठाकलात. आपणाला यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला 'यशस्विनी उद्योजकता सन्मान' पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.
- Awards Content:
- वर्ष: 2022, पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान, District: डोंबिवली, Youtube Video:
क्रीडाक्षेत्रात देशाची मान उंचावण्याचे काम करणारे खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षक अशी आपली ओळख! आपण क्रीडाक्षेत्रातील एक तळपता तारा असलात तरी हा प्रवास सोपा नव्हता. छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, डोंबिवली यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतून आपण खेळाच्या मैदानात पदार्पण केले. छत्रपती पुरस्कार विजेते कुमार कुलकर्णी, अर्जुन पुरस्कार विजेत्या मोनिका यांच्या मार्गदर्शनामुळे आपला खेळ बहरत गेला. त्यानंतर आपण मागे वळून कधीच पाहिले नाही. या पहिल्या संधीचे सोने करत आपण उत्तम कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळवलात. ऐन उमेदीच्या काळात आपण 'स्पोर्ट अथॉरीटी ऑफ इंडिया'मध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून भूमिका यशस्वीपणे निभावत आहात. क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम पाहताना आपण पुरुषांच्या कबड्डी संघालाही प्रशिक्षण दिले. कबड्डीप्रती असणाऱ्या आपल्या प्रेमामुळे एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दुहेरी भूमिकेत आपण आदर्श प्रस्थापित केलात. आपण घडविलेले कबड्डीपटू आज सातासमुद्रापार यशाची पताका फडकावत आहेत. आपण घडविलेले विराज लांडगे, रवींद्र कुमावत, निलेश शिंदे, काशिलिंग आडके या खेळाडूंनी 'प्रो कबड्डी लीग' ही स्पर्धा गाजविली. आपणास महाराष्ट्र शासनाचा २०११-१२ चा 'जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. जिद्द, चिकाटी, खिलाडूवृत्ती यामुळेच आपला हा प्रवास यशस्वी झाला. आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला 'यशस्विनी क्रीडा सन्मान' पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी पत्रकारिता सन्मान, District: ठाणे
गेली १८ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणाऱ्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर सध्या महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य माणूस व त्यांचे प्रश्न हे त्यांच्या पत्रकारितेचे कायम सूत्र राहिले आहे. समाजातील वंचित- उपेक्षित घटकांसाठी त्या सातत्याने लिखाण करतात. शोधपत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारच्या गैरप्रकारांवर वेळोवेळी प्रकाशझोत टाकला, हे प्रश्न तडीस नेले.
भयावह करोना संसर्गाची साथ पसरली आणि लॉकडाऊन लागला. या काळात महामारीला न घाबरता जगण्याच्या झगड्यात उभे राहिलेल्या सामान्य माणसांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष फिल्डवर शोधण्याचे व वृत्तपत्राच्या माध्यमातून ते मांडण्याचे काम शर्मिला ताईंनी सातत्याने केले. या प्रयत्नांची दखल घेत राज्यसरकारच्या कोव्हिड योद्धा या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
एकल महिलांचे प्रश्न, बालमृत्यूचे सातत्याने लपवण्यात येणारे आकडे,आश्रमशाळांमधील विद्यार्थीमृत्यू, बालगृहांची अवस्था, रक्तदान मोहिमेतील अनेक उण्या बाजू, रक्ताचा अपव्यय, दूषित रक्ताच्या प्रादुर्भावामुळे संसर्गित झालेल्या बालकांच्या आरोग्यहक्कासाठी ठोस भूमिका घेत सातत्याने त्यांनी प्रश्न मांडले. रुग्णालयांमधील गैरप्रकार तसेच व्यवस्था सुधारण्याच्या, सामान्य रुग्णाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या संघर्षात त्या ठामपणे उभ्या राहिल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची भूमिकाही त्यांनी वेळोवेळी चोख बजावली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाती घेतलेल्या जातपंचायतमुक्त मोहिमेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. मुंबईमध्ये महिलांना स्वच्छ, सुरक्षित शौचालये उपलब्ध व्हावी यासाठी सुरु झालेल्या ‘राईट टू पी’ या मोहिमेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
समाजातील वंचित घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शर्मिला ताई भरीव कामगिरी करीत आहेत. समाजातील विधायक बाजू दाखवत असताना प्रस्थापित यंत्रणेला जाब विचारणे हेच पत्रकाराचे काम असते, हे समाजभान त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसते. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील शेवटचा माणूस हा पत्रकारितेचा केंद्रबिंदू असायला हवा हे ब्रीद कामय जोपासणाऱ्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी क्रिडा प्रशिक्षक सन्मान, District: नाशिक
अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या अनेक व्यावसायिक क्षेत्रांकडे आजकालच्या मुलांचा ओढा आहे. क्रिडा या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने अजूनही विचार केला जात नाही. ग्रामीण भागात तर नाहीच नाही. नाशिक येथील रहिवासी शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांनी समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी होऊन देखील क्रिडा प्रकारातील रुची जोपासली.
आज घडीला शैलजा जैन यांनी तीनशे हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षित केले आहे. त्यांनी घडवलेले खेळाडू त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई खेळात भारतीय महिला कबड्डी संघास प्रशिक्षण दिले, त्याच संघाने सुवर्णपदक मिळविले. इराणच्या राष्ट्रीय महिला कबड्डी संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती तसेच पोलीस विभागाच्या कबड्डी संघास देखील त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. शैलजा जैन यांनी निवृत्ती नंतर देखील खेळाबद्दल असलेले प्रेम कमी होऊ दिले नाही. ग्रामीण भागात जाऊन त्यांनी टॅलेंट हंट राउंडद्वारे ४० मुलींची निवड केली आणि त्यांना नाशिक, महाराष्ट्र येथून दिडशे किमी अंतरावरील वनवासी आश्रम, गुही येथे अनेक प्रशिक्षण सत्रांद्वारे शैलजा यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
शैलजा यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा २००८ -०९ सालाचा जिजामाता राज्य छत्रपती क्रीडा पुरस्कार, नाशिक जिल्हा प्रशासनाचा २००२ सालाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
शैलजा जैन यांच्या प्रशिक्षणामुळे आपल्या भारतासाठी अनेक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत या सदिच्छा. शैलजा जैनेंद्रकुमार जैन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी क्रिडा प्रशिक्षक सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- Awards Content:
- वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: यशस्विनी सामाजिक सन्मान, District: पुणे
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्वाचे केंद्र म्हणजे पुणे…! अशा या शहरात लोकांची गर्दी वाढत असताना एका बाजूला त्या शहराचे पर्यावरण देखील लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. त्यापैकी ‘कचरा वेचक’ हा एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यांचे पर्यावरणातील योगदान, कामगार म्हणून त्यांचा दर्जा, शहराच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका हे देखील महत्वाचे आहे. हीच उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून १९९३ साली पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कचरा वेचकांनी एकत्र येऊन कागद काच पत्र कष्टकरी पंचायत ही संघटना स्थापन केली. या संस्थेच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणजे “लक्ष्मी नारायणन”! जवळपास १९८९ पासून त्या कचरा वेचणाऱ्यांसोबत काम करत आहेत.
आजच्या घडीला या संस्थेचे नऊ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आणि वंचित वर्गातल्या महिला आहेत. प्रत्येक सदस्य संस्थेला वार्षिक शुल्क आणि त्यांच्या जीवन विमा संरक्षणासाठी समान रक्कम देतो. या संस्थेच्या सदस्यांना पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त आय कार्ड दिले जातात आणि ते त्यांच्या कुटुंबासाठी, उदरनिर्वाहासाठी व्याजमुक्त कर्ज घेऊ शकतात तसेच त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी बाकीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आजच्या घडीला पुण्यात हिरवे स्वच्छ कोट आणि केशरी पुशकार्ट्स सगळीकडे आहेत कारण ३७०० कचरा वेचक दहा लाख झोपडपट्टीतील रहिवाशांसह पुण्यातील चाळीस लाख नागरिकांना सेवा देत आहेत. अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे ही संस्था पुण्यातील कचरा वेचक समुदायातील बालमजुरी दूर करण्यात, मुलांच्या शिक्षणाला मदत, क्रेडिट, परवडणारी वैद्यकीय सेवा आणि विमा सुलभ करण्यात सक्षम आहे.
कचरा वेचकांचे प्रश्न कायमचे सुटावेत आणि लक्ष्मी नारायणन यांच्या या कार्याची भरभराट व्हावी, या सदिच्छा. लक्ष्मी नारायणन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी सामाजिक सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



