औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एम.जी.एम. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने दरमहा राबविण्यात येणा-या चित्रपट चावडी या उपक्रमांत या महिन्यात अरविंद गजानन जोशी यांनी दिग्दर्शित केलेला तसेच ऑकलंड येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘अजात’ हा माहितीपट शनिवार, दि. १३ मे २०१७ रोजी संध्या ५.३० वाजता एम. जी. एम. ज्या आइन्स्टाइन सभागृहात दाखविण्यात येणार आहे. नुकताच ‘ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चित्रपट महोत्सवात ‘अजात’ साठी अरविंद जोशी यांना ‘अवार्ड ऑफ मेरिट’ मिळालाय. हा महोत्सवात उल्लेखनिय कामगिरी करणारा ‘अजात’ हा एकमेव भारतीय माहितीपट आहे. यावेळी माहितीपटाचे दिग्दर्शक अरविंद जोशी व त्यांचे सहकारी सत्यपालसिंह राजपूत हे याप्रसंगी उपस्थित राहून रसिकांसमवेत संवाद साधनार आहेत. < विदर्भातील मंगरूळ दस्तगीर (ता. चांदूर, जि. अमरावती) येथील गणपती महाराज यांच्या जीवनावर आधारलेला हा माहितीपट आहे. सुमारे १०० वर्षापूर्वी गणपती महाराजांनी विधवेशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांनी आपल्या शिष्यांनाही आंतरजातीय विवाह करण्याचे आदेश दिले. मंदिरप्रवेश, एकत्रित काला, स्त्रिमुक्ती अशी अनेककामे त्यांनी त्याकाळी केली. स्त्रियांना पितृसत्ताक दास्याचे प्रतिक असलेले कुंकू पुसून टाकायला सांगितले. विवाहीत स्त्रियांना मंगळसुत्र, बांगड्या काढून टाकायला सांगीतल्या. त्यांनी मुर्तिपुजेलाही विरोध केला. वर्चस्ववादी धर्मव्यवस्थेला विरोध करून ‘अजात’ पंथ गणपती महाराजांनी उभा केला. ‘अजात’ पंथाच्या विदर्भातील अनेक गावात पालखी निघायच्या. अजात पंथीय लोक गरीब आहे. त्यामुळे गणपती महाराजांच्या कार्याचे ऐतिहासीक दाखले मिळत नाही. अशा गणपती महाराजांचे कार्य म्हणजे महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक ‘अज्ञात’ पर्व होय. या माहितीपटाची निर्मिती करण्यापूर्वी अरविंद गजानन जोशी यांनी आपल्या मित्रांसमवेत विदर्भातील अनेक ग्रामिण भागात जाऊन तेथे गणपती महाराजांविषयी माहिती जमा केली. महाराजांच्या अनुयायांनी गायलेले भजने व पंढरपूर येथे मिळालेले भजनाचे संगीतच या माहितीपटासाठी वापरलेले आहे. चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत हा सिनेमा सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव मुकुंद भोगले, नीलेश राऊत, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, मंगेश निरंतर,गणेश घुले, श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार, त्रिशुल कुलकर्णी आदींनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद