औरंगाबाद : शालेय जीवनापासून कचरा हा आपल्या ऊर्जेचे स्रोत ठरू शकतो, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात जागविणे गरजेचे आहे. औरंगाबाद येथील रचनात्मक कार्यात अग्रेसर असलेला युवक परीक्षित सूर्यवंशी याने शालेय विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाच्या ठरू शकणार्‍या पुस्तिकेचे लिखाण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादच्या वतीने केलेले आहे. परीक्षित सूर्यवंशी लिखित ‘वेस्ट पासून बेस्ट’ या पुस्तिकेचे प्रकाशन शनिवार,दि. 30 जुन 2018 रोजी एमजीएमचे विश्वस्त तथा विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम यांच्या हस्ते औरंगाबाद येथे संपन्न झाले. ‘वेस्टपासून बेस्ट’ ही पुस्तीका विद्यार्थीवर्गाला समोर ठेवून लिहिलेली असून, शिक्षक/पालक यांच्या मार्गदर्शनाखाली यातील सांगितलेल्या कृती करायच्या आहेत. विद्यार्थी कचर्‍याची समस्या सोडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी आपल्या घरात जरी या पुस्तकात सांगितलेले - वर्गीकरण, कम्पोस्टिंग आणि रिसायकलिंग हे उपाय करायला सुरवात केली तरी खूप मोठा बदल घडून शकतो. तसचे घन कचर्‍याचा प्रश्न समजून घेऊ पाहणार्‍या आणि तो सोडविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करू इच्छिणार्‍या प्रत्येकाला हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. प्रत्येकाला कचरा साक्षर बनवू शकतील अशा उत्तम पद्धतीने परीक्षितने या पुस्तिकेचे लिखाण केलेले आहे. पुस्तकाची आकर्षक मांडणी, योग्य रंगसंगती, आवश्यक चित्रे, यामुळे पुस्तक वाचकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. तसेच पुस्तकाच्या शेवटी कचरा समस्येवर आधारीत भारतातील काही यशस्वी कथा दिलेल्या आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले, तर परीक्षित सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुबोध जाधव यांनी आभार मानले. सदरील पुस्तिका ही औरंगाबाद जिल्ह्यातील आठशे शाळांमध्ये वितरीत करणयात आलेली असुन, शालेय शिक्षकांनी कचर्‍याच्या जाणीव जागृती संदर्भात विद्यार्थ्यांकडून करून घ्यावयाच्या विविध कृतींचा यात समावेश आहे. यावेळी विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम यांनी वयाच्या 75 व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विभागीय केेंद्राचे सदस्य मा. डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी 61 व्या वर्षात पदार्पण केले. त्याबद्दल त्यांचे विभागीय केंद्राच्या वतीने मा. अंकुशराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिन मुळे, प्रा. अजीत दळवी, डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. श्रीरंग देशपांडे, प्रा. दासू वैद्य, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. मुस्तजीब खान, दिग्दर्शक शिव कदम, नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, प्रा. त्रिशूल कुलकर्णी, सुबोध जाधव, दीपक जाधव आदींची उपस्थिती होती.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद