यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी स्पिरीटेड अवे चित्रपट चावडी नाशिक (दि. ११) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,नाशिक,सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत शुक्रवार ८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध जपानी दिग्दर्शक हयाओ मियाझाकी यांचा स्पिरीटेड अवे हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. आधुनिक संपन्न जपानमधील बिहीरो आणि तिच्या आईवडीलांची ही साधी सोपी गोष्ट आहे. एका जुन्या मोडकळीला आलेल्या मनोरंजन उद्यानात हे तिघेजण अपघाताने येतात. तिथुन मियाझाकी आपल्या सर्वांना एका वेगळ्याच परीकथेचा स्पर्श असलेल्या जगात घेऊन जातो. ‘स्पिरीटेड अवे’ ही एका अर्थाने आधुनिक परीकथाच आहे. चिहीरो ही जपानच्या तरूण पिढीची प्रतिनिधी आहे. तिच्या पुढील पर्यायाने जपानी समाजापुढील अनेक आव्हाने व प्रश्‍न यांचा उहापोह चित्रपटात येतो. मियाझाकी हे जपानचे अत्यंत नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक आहेत तसेच ते तत्वज्ञानी आहेत. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या जपानी चित्रपटाचा कालावधी १२५ मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक