मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कारासाठी’ अर्ज करण्याचे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

या पुरस्कारासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक ट्रान्सजेंडर किंवा दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पुरस्काराची रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२३ आहे, अशी माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.

दरवर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध विभागासाठी जाहीर करण्यात येणार आहे. तरी यावर्षीच्या पुरस्कारासाठी कोकण विभागाची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, आणि मुंबई उपनगर, या जिल्ह्यातील अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती खा. सुळे यांनी दिली.

पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. या वेबसाईटवर उपलब्ध फॉर्म डाउनलोड करून अर्ज सादर करता येतील.