मुंबई- थोर साहित्यिक, कविवर्य ना.धों. महानोर यांचे निधन झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा त्यांना प्रेमळ सहवास लाभला. शरदचंद्रजी पवार साहेबांचे ते दीर्घकाळ सहकारी राहिले.

महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी त्यांची ओळख करून दिली जाते. अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे हे त्यांचे गाव. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.पण ते रमले शेतीतच...!

अतिशय तरल सामाजिक जाणीव असणारा निसर्गकवि, बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही आवडीने ऐकली जातात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख आहे. त्यांच्या निधनामुळे निसर्गाच्या समवेत राहून शेती माती आणि निसर्ग संस्कृतीसाठी कटिबद्ध असणारा साहित्यिक हरपला.