मुंबई: "एआयच्या (AI) मदतीने काही सेकंदांत माहितीचे विश्व आपल्यासमोर उलगडते, त्यामुळे पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचे भान ठेवून काळाच्या पुढे वाटचाल करावी," असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित ‘महिला पत्रकार संमेलन २०२६’ च्या उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या. पत्रकारितेच्या क्षेत्रातील महिलांचे योगदान, त्यांचे अनुभव, आव्हाने आणि बदलत्या माध्यमविश्वातील त्यांची भूमिका यावर मंथन घडवून आणण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत-प्रभावळकर, ‘क्वेश्चन ऑफ सिटीज’च्या संस्थापक संपादक स्मृती कोप्पिकर, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके आणि सेंटरचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज एआयच्या माध्यमातून निवडणुकांची आकडेवारी, मतांची टक्केवारी आणि सखोल विश्लेषण काही क्षणांत उपलब्ध होते. भावी पत्रकारांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या, "वर्तमानपत्र वाचणारी माझी पिढी एक दिवस थांबेल, पण तुमची पिढी तिथेच थांबता कामा नये. काळाच्या मागे पडू नये म्हणून दर दोन-तीन वर्षांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःची कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि त्याचा संभाव्य गैरवापर या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत." पत्रकारिता हा अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय असून नैतिकता आणि जबाबदारी हे त्याचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. संविधानाच्या चौकटीत राहून, त्यातील मूल्यांचा आदर करत महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपली ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात ‘राजसत्तेतल्या कारभारणी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले, ज्याबद्दल अतिथी संपादक निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना स्मृती कोप्पिकर यांनी अशा संमेलनांमधून महिला पत्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पूर्वी महिला पत्रकारांना ठरावीक विषयांपुरते मर्यादित ठेवले जायचे, मात्र आज त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे, असे नमूद करत त्यांनी महिला पत्रकारांना मासिक पाळीदरम्यान रजा मिळावी, अशी आग्रही मागणी केली. समाजातील घडामोडींचा दस्तऐवज तयार करण्याची पत्रकारितेची भूमिका शंभर वर्षांपूर्वी जितकी महत्त्वाची होती, तितकीच ती आजही कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्घाटन सत्राचा समारोप डॉ. रेखा शेळके यांनी केला, तर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या उपवृत्तसंपादक प्रगती बाणखेले यांनी संवादक म्हणून काम पाहिले.
संमेलनाच्या पुढील सत्रात ‘अँकरिंग – अनुभव, आव्हाने व बदलते स्वरूप’ या विषयावर न्यूज १८ ग्रुपच्या फराह खान, एनडीटीव्ही मराठीच्या वैष्णवी राऊत आणि मुंबई तकच्या अनुजा धाक्रस यांनी विचार मांडले, ज्याचे सूत्रसंचालन ‘बाईमाणूस’च्या संजना खंडारे यांनी केले. तिसऱ्या सत्रात ‘संपादकीय विश्वातील महिला नेतृत्व’ या विषयावर ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, ‘दिव्य मराठी’च्या निवासी संपादक दीप्ती राऊत आणि ‘नवभारत व नवराष्ट्र डिजिटल’च्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी आपले अनुभव कथन केले, तर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अनुजा चवाथे यांनी सूत्रसंचालन केले. ‘स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज’ या चौथ्या सत्रात रेणुका कल्पना, अश्विनी सताव-डोके आणि स्वप्नाली सपकाळे यांनी फ्री-लान्सिंग पत्रकारितेतील बरे-वाईट अनुभव व समस्या मांडल्या, ज्याचे सूत्रसंचालन ‘इंडी जर्नल’च्या प्राजक्ता जोशी यांनी केले.
पाचव्या सत्रात ‘दुष्काळाच्या झळा’ या विषयावर ‘सकाळ मीडिया ग्रुप’च्या दीपा कदम यांनी वरिष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख आणि स्तंभलेखिका कविता अय्यर यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि 'जलयुक्त शिवार' योजनेवर भाष्य करताना, हा भाग 'मराठवाडा नव्हे तर टँकरवाडा' झाला असल्याची उपरोधिक टिप्पणी करण्यात आली. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने सूतगिरण्या उभारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. तसेच, मराठवाड्याचे अर्थकारण उसावर अवलंबून असून ऊसतोडीतून रोजगार मिळतो, त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी बहु-क्षेत्रीय लेखापरीक्षण (ऑडिट) होणे आवश्यक असल्याचे कविता अय्यर यांनी सांगितले. संमेलनाच्या समारोपीय सत्रात ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वरिष्ठ सहाय्यक संपादक अलका धुपकर यांनी दिवसभरातील सर्व सत्रांचा आढावा घेतला. चव्हाण सेंटरचे महिला विभाग प्रमुख प्रशांत ईखार यांच्या परिश्रमातून यशस्वी झालेल्या या संमेलनाने महिला पत्रकारितेचा प्रवास, नेतृत्वाच्या संधी आणि व्यावसायिक आव्हानांना एक प्रभावी व्यासपीठ मिळवून दिले.



