मालती सगणे

यशस्विनी सामाजिक सन्मान
2026

एका साध्या गृहिणीच्या आत्मविश्वासाने जेव्हा चळवळीचे रूप घेतले, तेव्हा तळागाळातील हजारो महिलांच्या आयुष्याला संघर्षाची नव्हे, तर खऱ्या अर्थाने नेतृत्वाची नवी दिशा मिळाली. चंद्रपूरच्या चिंचला या छोट्याशा गावातून एका बचत गटाची सदस्या म्हणून सुरू झालेला हा प्रवास अत्यंत विलक्षण आहे! मालतीताई सागणे यांनी केवळ स्वतःचे आर्थिक स्वावलंबन साध्य केले नाही, तर महिलांना राजकीय सत्तेत आणि ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी 'महिला राजसत्ता आंदोलन'च्या राज्य संयोजिका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लढा उभारला. चांदा ते बांदा असा त्यांच्या कार्याचा व्याप राज्यभर पसरलेला आहे.

'यशदा' आणि 'माविम'सारख्या अत्यंत नामांकित संस्थांच्या माध्यमातून राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील हजारो निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना पंचायती राज, अर्थसंकल्प आणि सुशासनाचे धडे दिले. तंटामुक्त समिती असो वा अवैध व्यवसाय प्रतिबंध... प्रत्येक सामाजिक आघाडीवर मालतीताई नेहमीच ठामपणे उभ्या राहिल्या.

त्यांच्या या अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल 'उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ती' आणि 'स्टेट बँक सामाजिक सन्माना'ने त्यांना आधीच गौरविण्यात आले आहे. बचत गटाच्या एका साध्या सदस्यापासून ते राजकारणातील महिलांच्या सबलीकरणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आज प्रत्येक स्त्रीसाठी दीपस्तंभ ठरत आहे. स्वत: घडत असताना इतरांना घडविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे.

कर्तृत्ववान, कणखर श्रीमती मालतीताई सागणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “'यशस्विनी सन्मान पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media