Devrashtre Home

देवराष्ट्रे हे गाव सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेबांचे देवराष्ट्रे हे आजोळ. याच गावात त्यांचा जन्म झाला व येथेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रात त्यांनी देवराष्ट्रेबद्दल भरभरून लिहिले आहे.

गावाच्या पश्चिमेला सह्याद्रीची डोंगररांग आहे. या डोंगराच्या पायथ्याशी सागरेश्वर मंदीर आहे. याच परिसराला सागरेश्वर खिंड किंवा सागरोबा खिंड म्हटले जात होते.

या खिंडीतून अनेकदा यशवंतराव चव्हाण साहेब चालत आपल्या आजोळी यायचे त्यामुळे आता त्याचे 'यशवंत खिंड' असे नामकरण केले आहे. याच परिसरात असलेल्या रानकवी यशवंत तांदळे यांनी या नामकरणाबाबत एक कवन रचले होते.

चव्हाण साहेबांच्या आयुष्यातील बालपणीचा काळ या गावात गेला, त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सुद्धा याच गावात झाली. आज देवराष्ट्रे गावात त्यांच्या जन्मघराच्या जागी स्मारक उभारले आहे. एका सामान्य गरीब कुटुंबातील यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्रीपद स्वीकारून जेव्हा या गावात आले तेव्हा गावातील प्रत्येक घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या,गावतील प्रत्येक घरात पुरणपोळी बनवली होती. त्यांचे गावातील आगमन एका सणासारखे साजरे केले होते.

देवराष्ट्रे प्राचीन गाव आहे. या गावाला असलेल्या प्राचीन इतिहासाबाबत अनेक ठिकाणी नोंदी आढळून येतात. या गावात मंदिरे खूप आहेत. पूर्वीच्या काळात औतकामासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पिंडी आढळून यायच्या. त्यामुळेच सोमवार हा दिवस गावकरी पाळतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी गावची यात्रा भरते.

याच गावातील एका सुपुत्राने आपल्या गावाचे नाव देशाच्या नकाशावर आणले, या गोष्टीचा गावकऱ्यांना अभिमान वाटतो. चव्हाण साहेबांच्या कार्यावर गावातील लोकांची श्रद्धा आहे. गावात त्यांचा भव्य पुतळा आहे. चव्हाण साहेबांच्या जयंती पुण्यतिथीला गावातील लोक एकत्रितपणे अभिवादन करतात.

चव्हाण साहेबांचे सहकारी धों. म. मोहीते यांच्या अथक परिश्रमातून देवराष्ट्र येथे सागरेश्वर अभयारण्य उभारले गेले. या अभयारण्याच्या उभारणीसाठी चव्हाण साहेबांनी मोलाचे योगदान दिले होते, त्यामुळे या अभयारण्यास ‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य’ असे नाव दिले गेले.