हा उपक्रम आहे तरी काय?

वैविध्यपूर्ण आणि संपन्नतेने नटलेल्या या महाराष्ट्रातील युवांनी, आपला परिसर सोडून  मराठी मुलुखाच्या कानाकोपर्‍यात जावून तेथील माहीती तसेच तेथील आचार-विचार, भाषा, आवडी-निवडी, सवयी, व्यवहार, संस्कृती यांचे आदान-प्रदान करण्याची एक जाणीव प्रक्रिया म्हणजे युवा अभिसरण होय.

संकल्पना

आपल्या महाराष्ट्र वैविध्यपूर्ण आणि संपन्नतेने नटलेला असा हा मुलुख आहे. या बद्दल बोलायचे झाले तर वेळ आणि जागा कमी पडेल. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक भूभागाचे एक वेगळेपण आहे. बोलीभाषा, बोलण्याची लकब, पेहराव, खाद्यसंस्कृती, आदराथित्य, पारंपारिक शेतीपद्धती, पारंपारिक व्यवसाय व उद्योगधंदे तसेच भौगोलिक, सामाजिक आणि राजकिय परिस्थिती त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते अगदी इथल्या निसर्गामध्येही हे वेगळेपण जाणवते. ही महाराष्ट्रभूमी संतांची, सुधारकांची, शुरांची अन् वीरांची, कलावंतांची अन् साहित्यिकांची, कष्टकर्‍यांची अन् शेतकर्‍यांची, उद्योजकांची अन् राज्यकर्त्यांची…!

या सर्व गोष्टी जाणून घेण्याने, जोपासल्यामुळे आपली मराठी अस्मिता टिकेल असे आम्हाला वाटते. महाराष्ट्र राज्याची पन्नास वर्षे उलटून गेली तरीही हे सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी, जोपासण्यासाठी काही ठोस उपक्रम हाती घेण्याचे सोडून आपणा मात्र ‘प्रयत्न करायला पाहीजे’ अशीच भाषा करतोय. प्रांतवाद किंवा भाषावाद उकरुन हीच मराठी अस्मिता हिंसक मार्गाने रस्त्यावर आणण्यापेक्षा आता ही मराठी मने या मराठी मातीशी जोडण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.

ही गरज जाणून आणि महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागाने युवा देशाच्या युवा राज्यातील युवांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आणि सुरु केला अनोखा उपक्रम..... युवा अभिसरण…!

अभिप्राय

अभिसरणमुळे करिअर वाट झाली सुकर…

सर्वसामान्यांप्रमाणे माझे देखील स्वप्न होते, मुंबई बघायचे. वर्ष २०११-१२ च्या दरम्यान ‘अभिसरण’ च्या माध्यामातून ते स्वप्न पूर्ण झाले. ज्येष्ठ संपादक जयदेव डोळे सरांनी आम्हाला मराठवाड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. औरंगाबाद येथून निघून आम्ही मुंबईला येऊन पोहोचलो. जवळपास आम्ही ४० विद्यार्थी होतो.

या उपक्रमांतर्गत आम्हला आगरी कोळी कुटुंबामध्ये राह्यला मिळाले तसेच त्यांचे दैनंदिन जीवन कसे आहे? याचा अभ्यास करण्यास मिळाले. मुंबईतील मंत्रालय, विधानभवन, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, जुहू समुद्र, हाजी अली दर्गा अशी विविध आकर्षक स्थळे आम्हाला पाहायला मिळाली. त्याचबरोबर विविध तज्ञ मान्यवरांकडून मुंबईची ऐतिहासिक तसेच आर्थिक पार्श्वभूमी ऐकायला मिळाली. या उपक्रमाचा आमच्या करिअरमध्ये खूप उपयोग झाला.

गजेंद्र वैजीनाथ गवंडर
(बॅच २०१२)

अभिसरण - सामाजिक दृष्टीकोन जागवणारा उपक्रम

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ‘अभिसरण’ या युथ एक्सचेंज उपक्रमात पदवीचे शिक्षण घेत असताना सहभागी झालो होतो. अत्यंत साधेपणाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विविध व्यक्तिमत्वांशी कशा पद्धतीने बोलावे, आपले विचार कशा पद्धतीने मांडावे; याबद्दल सखोल शिकता आले. तसेच त्या भागातील विविध पूर्व रूढी परंपरेचा अभ्यास करता आला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विषयतज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लाभले. या उपक्रमादरम्यान निर्माण झालेली नाती आज दहा वर्षांनी देखील तेवढीच दृढ आहेत. या पंधरा दिवसांच्या प्रवासादरम्यान समाजातीळ प्रत्येक घटकाला समजून घेता आले. एक प्रकराची जाणीव निर्माण झाली. या अभिसरणमुळे माझ्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात एक सकारात्मक बदल घडून आला आहे.

प्रा. रंजीत बायस
रामनारायन रूईआ महाविद्यालय, मुंबई.
(बॅच २०१२)


आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव...

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या अभिसरण या उपक्रमामुळे माझ्यातही अभिसरण झाले. होय...! महाविद्यालयीन आयुष्यात अभिसरणमुळे नवी दिशा मिळाली. एक ध्येय मिळाले. आज एका मोठ्या संस्थेत चांगल्या पदावर काम करतोय, त्यात अभिसरणचा नक्कीच वाटा आहे. हे कधीच विसरुन चालणार नाही. मुंबईत खूपवेळा आलो होतो, पण अभिसरणमुळे वेगळीच मुंबई पाहायला मिळाली.

धारावीसारख्या गर्दीच्या ठिकाणी राहण्याचा अनुभव तर खूप काही शिकवून गेला. आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शनची गरज असते. त्या टप्प्यावेळीच माझ्या आयुष्यात अभिसरण आले. अभिसरणमुळे आत्मविश्वास प्रचंड वाढला. ध्येय ठरले. काय करायला हवे? काय करायला नको? कसे बोलावे...! अशा अनेक गोष्टी शिकता आल्या. शेवटी एकच सांगतो अभिसरणमुळे आयुष्याला नवी कलाटणी मिळाली..., धन्यवाद अभिसरण!

नामदेव कुंभार
सिनियर कंटेंट राईटर, एबीपी माझा

‘अभिसरण’ युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा उपक्रम

मी, युवा अभिसरण मोहीम २०१० साली पश्चिम महाराष्ट्र ते कोकण विभागात झालेल्या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे ‘आपलाच महाराष्ट्र’ एका व्गेल्या नजरेतून पाहायला मिळाला. तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. माझा आत्मविश्वास वाढला त्याचबरोबर नेक चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या. ‘पर्यटन’ माणसाला खूप काही शिकवते. त्यामुळे अनेक आठवणी तयार होतात. त्याच आठवणींचा उपयोग भविष्यात होतो.

'हसत खेळत शिक्षण’ याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला मिळाला. या दौऱ्यामध्ये आम्हाला तेथील ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळाली. त्याचबरोबर तेथील औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाबाबतही माहिती मिळाली.

अशा उपक्रमामधूनच युवा पिढीला आपली संस्कृती व संपूर्ण महाराष्ट्र जाणून घेण्यास मदत होते, हा हेतू चव्हाण सेंटरने जाणला. युवा पिढीला मार्गदर्शक ठरणाऱ्या अशा उपक्रमांना माझ्या खूप शुभेच्छा.

अनुजा शाळू