राज्य आल्यावर त्याचा वापर कसा करायचा ही भूमिका मांडण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक व्याख्यानातून केले. पंचायत राज्याची यंत्रणा आणली. इतकेच नाही तर सामाजिक, शेती, शिक्षण, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी त्यांनी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी महत्त्वाची होती असे उद्गार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान महत्त्वाचे आहेच शिवाय हे राज्य मराठी भाषिकांचे होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण यात महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले असेही ते म्हणाले.
मुंबई दि. १४ : प्रत्येक काळात आव्हाने असतातच. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळीही खुप मोठी आव्हाने होती. यशवंतराव चव्हाणांकडे महाराष्ट्राचे नेतृत्व होते.सन १९५७ ते १९६० हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. महाराष्ट्राच्यासमोर पैसा, शिक्षण, दारिद्र्य अशी अनेक आव्हाने होती. यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे उत्तुंग काम केले. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत यासाठी ईबीसी सवलत मंजूर केली. राजकारणात तोच टिकून राहतो, जो आव्हाने पेलतो. राजकारणामध्ये सगळ्यांना सगळंच करावं लागतं, पण मिळवलेली सत्ता कोणासाठी वापरायची हे ज्याला कळलं तोच यशस्वी राज्यकर्ता ठरतो असं ते म्हणत. विरोधकांनाही सन्मान देणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता. विरोधी पक्षातील भाई उद्धवराव पाटील सभागृहात मत व्यक्त करताना सत्ताधारी सुद्धा शांत बसत. परंतु हल्ली सभागृहात लोकप्रतिनिधी दंगा करताना दिसतात, आपण का दंगा करतो आहोत हे देखील त्यांना समजत नाही. केवळ दंगा करणे म्हणजे आव्हानाला तोंड देणे नव्हे, तर आव्हानांना प्रतिआव्हान देणारा समाज निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, माजी उपप्राचार्य प्रा. आनंदराव जाधव यांनी व्यक्त केले.