सेंटरची अद्ययावत सभागृहे आणि तेथे होणारे कार्यक्रम यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटरची ओळख ही दक्षिण मुंबईमधील सांस्कृतिक, सामाजिक केंद्र अशी झाली आहे. ६५० आसनव्यवस्थेचे यशोदर्शन (मुख्य) सभागृह, २२५ आसनव्यवस्थेचे कृष्णाकाठ (रंगस्वर) सभागृह आणि १५० आसन व्यवस्थेचे यमुनाकाठ (सांस्कृतिक) सभागृह यांची उपलब्धता असल्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांना आवश्यक सुविधा एकाच इमारतीमध्ये मिळतात.

यशोदर्शन (मुख्य) सभागृह

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सुसज्ज यशोदर्शन (मुख्य) सभागृह हे मुंबईमधील प्रमुख सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणारे ठिकाण आहे. शहरामध्ये उच्च दर्जाच्या सोयी आणि उत्तम व्यवस्था पुरवणा-या सभागृहांमध्ये हे सभागृह आघाडीवर आहे. एकूण ५६४ आसन क्षमता असणा-या या सभागृहाचा वापर विविध कार्यक्रमांसाठी तसेच निरनिराळ्या सामाजिक संस्था, शासनातर्फे आयोजित केलेल्या सभा, संमेलने, चर्चा, परिसंवाद, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, बैठका यांसाठी करण्यात येतो. मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी नाटके, संगीतसभा आदी कार्यक्रमांसाठी सभागृह भाडेतत्वावर देण्यात येते. वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी खुर्च्या, अप्रतिम डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टिम इत्यादी सुविधांनी यशोदर्शन (मुख्य) सभागृह सुसज्ज आहे. या सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यशवंतरावांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण तसेच पुण्यतिथीदिनी राज्य पुरस्कारांचे वितरण, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

कृष्णाकाठ (रंगस्वर) सभागृह

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील चौथ्या मजल्यावरील कृष्णाकाठ (रंगस्वर) सभागृह सांस्कृतिक कार्यक्रम, प्रायोगिक नाटके, परिषद, बैठक, याकरीता देखील आदर्श आहे. अद्ययावत ध्वनी व्यवस्था, भव्य व्यासपीठ यामुळे मध्यम आकाराच्या तरीही सुसज्ज सभागृहामध्ये कृष्णाकाठ (रंगस्वर) सभागृह अप्रतिम ठरले आहे. २२५ बैठकव्यवस्था असणा-या सभागृहामध्ये आवश्यकतेनुसार बैठक व्यवस्थेत बदल करण्याचे स्वातंत्र्य देखील या सभागृहामध्ये मिळते. या सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे बैठका, चर्चासत्रे, कार्यशाळा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यमुनाकाठ (सांस्कृतिक) सभागृह

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील चौथ्या मजल्यावरील यमुनाकाठ (सांस्कृतिक) सभागृह मर्यादीत व्यक्तींच्या कार्यक्रमासाठी आदर्श आहे. सभागृहामध्ये १५० व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था होऊ शकते. या सभागृहाच्या आकाराला साजेसे व्यासपीठ, आवश्यक ध्वनीव्यवस्था आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमाकरीता आवश्यक सोयी उपलब्ध करून देता येतात. कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार बैठक व्यवस्था व इतर सजावट करण्याचे स्वातंत्र्य या सभागृहात मिळते.