राज्यभरात दौऱ्याच्या तसेच विविध कामाच्या निमित्ताने फिरत असताना अनेक सहकारी, मित्र व कार्यकर्ते आदी भेटायला येतात. हे सर्वजण भेटायला येत असताना अगदी मायेने काही ना काही भेटवस्तू, हार, पुष्पगुच्छ अगर एखादी फोटो-फ्रेम आवर्जून आणतात. या सर्वांना मी मध्यंतरी अशा वस्तू आणण्याऐवजी मला पुस्तके भेट द्या असे आवाहन केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. माझ्याकडे आणि आदरणीय पवार साहेबांकडे भेट म्हणून आलेली अनेक दर्जेदार पुस्तके जमा होत आहेत. आलेले पुस्तक जर आम्ही वाचलेले नसेल तर आम्ही ते आधी वाचतो व नंतर ती वाचून झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या राष्ट्रीय ग्रंथालयास दिली जातात. तेथे ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांमध्ये आलेले नवीन पुस्तक आधीपासून नसेल तर ते राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये ठेवून घेतले जाते व जर ते आधीपासून उपलब्ध असेल तर हि पुस्तके 'पुस्तकदूत' योजनेच्या माध्यमातून गरजू वाचकांना फक्त पोस्टेज खर्चामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी ठेवली जातात.ही पुस्तकदूत योजना अधिकाधिक पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी चव्हाण सेंटरच्या माध्यमातून #PustakDoot ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाईटवर आपण पुस्तकांची नावे पाहून ती पटकन बुक करून केवळ पोस्टेज खर्चामध्ये मागवू शकाल.या माध्यमातून आपल्याकडे लवकरात लवकर कोणत्याही अडचणींशिवाय पुस्तके पोहोचतील. आपण पुस्तकदूत या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वेबसाईटवर आपली नोंदणी अवश्य करा, जेणेकरून आपल्याला हवे ते पुस्तक पटकन ऑर्डर करता येईल.

आपण सर्वांनी आम्हाला अतिशय प्रेमाने भरपूर अशी पुस्तके दिली. ज्ञानाचे हे अगाध असे भांडार असून आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार.