यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
दिनांक ११ जुलै २०२६ रोजी नाशिक येथे या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.
२०२५ सालचा युवा क्रीडा पुरस्कार सुकांत कदम, राजश्री गुगळे यांना जाहीर झाला आहे. सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दीक्षा दिंडे व प्रसाद गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये युवराज सोनार, पृथ्वीराज माळी, ऋचिका खोत आणि वैष्णवी ढोरे यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२५ देऊन गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कारांमध्ये कमलेश महाले, श्वेता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ऋतुजा मोरे, सुशांत देसाई या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पत्रकारिता युवा पुरस्कारात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीकांत बंगाळे, प्रियांका तुपे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच इनोव्हेशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पूर्वा महाजन, निखिल जाधव यांना युवा इनोव्हेटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.




