श्रीकांत साव

साहित्य पुरस्कार
चंद्रपूर
2026

एकेकाळी पाटलांच्या वाड्यात समृद्धी नांदत होती. पण नियतीचा घाव बसला... वडिलांचे छत्र हरपले, आणि घरादारावर अभावाची काळी सावली दाटली. चार भावंडांतल्या एकुलत्या एका मुलाला शिकवण्यासाठी आईने स्वतःचे अश्रू डोळ्यांतच जिरवले... दुसऱ्यांच्या घरात, हॉटेलांत भांडी घासून मुलाच्या पंखांत शिक्षणाचं बळ भरलं!

सरदार पटेल महाविद्यालयातून बी.ए., एम.ए. आणि नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.फिल.! विद्यापीठ सचिव आणि एक धारदार राज्यस्तरीय वादविवादपटू म्हणून श्रीकांत यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण नियतीची परीक्षा अजून संपली नव्हती. आजोबा, आजी, सख्खा भाऊ... आणि हुंड्याच्या आगीत होरपळलेली लाडकी बहीण! एकापाठोपाठ बसलेल्या या आघातांनी मन पुरतं छिन्नविच्छिन्न झालं. पण, जगण्याची जिद्द अजून संपली नव्हती. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असतानाच तरुणाईसमोर आ वासून उभी राहिली सरकारी भरतीची मंदी. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून श्रीकांत साव रस्त्यावर उतरले. २०१३ ते २०१८ सुशिक्षित बेरोजगारांचे महामोर्चे चालू होते! रस्त्यावरून उठणारा हा आक्रोश त्यांनी गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत गाजवला... लाखो हातांना हक्काचा आवाज दिला.

त्यानंतर आला कोरोनाचा जीवघेणा काळ... दोन-दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून ते परत आले. बंद पडलेली अकॅडमी आणि आतल्या आत उसळणारं अस्वस्थतेचं वादळ! अशा अंधाऱ्या वळणावर ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर यांचे शब्द संजीवनी ठरले— "जे मनात दाटून आलंय, ते थेट कागदावर उतरव!"

आणि... दुःखाच्या राखेतून शब्दांची नवी पालवी फुटली! अश्रूंची शाई झाली आणि जन्माला आला एक जळजळीत दस्तऐवज— 'अभोगी रोजगाराचा हंगाम'! साहित्य अकादमी विजेते श्रीकांत देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या दिग्गजांनीही ज्या लेखनाचे कौतुक केले, त्या शब्दांनी व्यवस्थेने नाकारलेल्या उपेक्षितांच्या वेदनेला थेट आवाज दिला.

आईच्या कष्टांचं पवित्र देणं, संघर्षाची जाणीव आणि मातीशी घट्ट जोडलेली नाळ... ज्यांच्या लेखनात केवळ शब्द नाहीत, तर जळत्या वास्तवाची जिवंत साक्ष आहे; अशा संवेदनशील कवी, झुंजार लढवय्या श्रीकांत साव यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फौंडेशनचा 'ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी