प्रथमेश पाटील

युवा पत्रकारिता पुरस्कार
2024

मूळचे सांगलीचे असलेले प्रथमेश पाटील यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यांच्या पत्रकारितेचा खऱ्या अर्थाने प्रवास हा वयाच्या १९ व्या वर्षी सुरु झाला.

वयाच्या १९व्या वर्षी, जानेवारी २०११ मध्ये त्यांनी ‘द बंक’ नावाचे एक इंग्रजी मासिक काढले. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी त्याकाळी जवळपास ४ वर्षे स्व-खर्चातून हे मासिक चालवले. त्यानंतर २०१३ साली पत्रकारीतेतील मित्रांच्या सहकार्याने ‘सुंबरान: जागर तरुणाईचा’ हे नियतकालिक सुरु केले. पुढे काही कारणांस्तव चार वर्षांनी हे नियतकालिक बंद केले व त्यांनी ‘पुणे मिरर’ आणि ‘सकाळ टाइम्स’ या वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केले.

२०१८ साली प्रथमेश यांनी ‘इंडी जर्नल’ ची स्थापना केली. भारतीय उपखंडाचा दृष्टीकोन स्वतंत्रपणे मांडता यावा, या उद्देशाने इंडी जर्नलचा त्यांनी घाट घातला. २०१८ पासून ते आजतागायत, वाचकांच्या देणगीमूल्यातून चालणारी मराठीतील एकमेव वृत्तसंस्था म्हणजे ‘इंडी जर्नल’ ! त्यांनी आजपर्यंत कामगारांचे, शोषितांचे, वंचितांचे प्रश्न लावून धरले तसेच अनेक प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये शोध पत्रकारिता केली, तसेच सामाजिक अन्यायाच्या घटनांना वाचा फोडली. इंडी जर्नल खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेची गौरवशाली परंपरा पुढे घेऊन जात आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. इंडी जर्नलच्या पत्रकारितेला लिंगभाव आणि स्त्रियांविषयक संवेदनशील वार्तांकनासाठी तब्बल ३ 'लाडली' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच मुंबई प्रेस क्लब तर्फे दिला जाणारा मानाचा 'रेड इंक' पुरस्कारही इंडी जर्नलनं मिळवला आहे.

पत्रकारीतेबरोबर ते एक अनुवादक देखील आहेत. ‘रावण: राजा राक्षसांचा’ हे मराठी पुस्तक इंग्रजीमध्ये, तर ‘रेनेसॉन्स स्टेट’ हे इंग्रजी पुस्तक मराठीमध्ये त्यांनी अनुवादित केले आहे.

निर्भय पत्रकारितेतील या युवा चेहऱ्यास भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! कोणत्याही प्रलोभनांना आणि व्यावसायिक गणितांच्या दबावाला बळी न पडता प्रथमेश यांची ही पत्रकारिता अशीच वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छा !

प्रथमेश पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी