जान्हवी प्रसाद पाटील

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
कोल्हापूर
2022

लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून, कोल्हापूरातून आपण पत्रकारितेची सुरुवात केली. आपल्या समर्थ लेखणीच्या जोरावर पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले. दैनिक 'पुढारी' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये पत्रकारिता करताना विविध विषयांवर आपण केलेल्या चौफेर लिखानाने जनमानस तयार केले. पत्रकारिता करताना आपल्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. ही वैचारिक प्रगल्भता आपल्या पत्रकारितेतही ठळकपणे आढळून येते. कोल्हापूरसारख्या शहरातून सुरू केलेला पत्रकारितेचा प्रवासठाण्यासारख्या शहरात आल्यावर अधिक गतिमान झाला.

एक दशकाहून अधिक काळ पत्रकारिता करत असताना सामाजिक, महिलाविषयक, विकासात्मक गोष्टी हा आपल्या चिंतेचा आणि चिंतानाचा विषय राहीला आहे. त्यासोबतच आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लेख लिहून समाजात मंथन घडवून आणले. आपण केलेल्या 'जात पंचायत पैसे परत करणार' या बातमीसाठी प्रतिष्ठेचा 'लाडली मीडिया' पुरस्कार प्राप्त झाला. आपल्या कार्याची दखल म्हणून २०११ आणि २०१३ साली महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ट पत्रकारिता' पुरस्कार आपणास प्राप्त झाला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वास्तव लोकांपर्यंत पोहचवण्याचे आपले हे कार्य कौतुकास्पद आहे. आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशस्विनी पत्रकारिता सन्मान " पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.