सिमरत गायकवाड

यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान
डोंबिवली
2022

क्रीडाक्षेत्रात देशाची मान उंचावण्याचे काम करणारे खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षक अशी आपली ओळख! आपण क्रीडाक्षेत्रातील एक तळपता तारा असलात तरी हा प्रवास सोपा नव्हता. छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, डोंबिवली यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतून आपण खेळाच्या मैदानात पदार्पण केले. छत्रपती पुरस्कार विजेते कुमार कुलकर्णी, अर्जुन पुरस्कार विजेत्या मोनिका यांच्या मार्गदर्शनामुळे आपला खेळ बहरत गेला. त्यानंतर आपण मागे वळून कधीच पाहिले नाही. या पहिल्या संधीचे सोने करत आपण उत्तम कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळवलात. ऐन उमेदीच्या काळात आपण 'स्पोर्ट अथॉरीटी ऑफ इंडिया'मध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून भूमिका यशस्वीपणे निभावत आहात. क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम पाहताना आपण पुरुषांच्या कबड्डी संघालाही प्रशिक्षण दिले. कबड्डीप्रती असणाऱ्या आपल्या प्रेमामुळे एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दुहेरी भूमिकेत आपण आदर्श प्रस्थापित केलात. आपण घडविलेले कबड्डीपटू आज सातासमुद्रापार यशाची पताका फडकावत आहेत. आपण घडविलेले विराज लांडगे, रवींद्र कुमावत, निलेश शिंदे, काशिलिंग आडके या खेळाडूंनी 'प्रो कबड्डी लीग' ही स्पर्धा गाजविली. आपणास महाराष्ट्र शासनाचा २०११-१२ चा 'जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. जिद्द, चिकाटी, खिलाडूवृत्ती यामुळेच आपला हा प्रवास यशस्वी झाला. आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला 'यशस्विनी क्रीडा सन्मान' पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.