शर्मिला प्रभाकर कलगुटकर

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
ठाणे
2023

गेली १८ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणाऱ्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर सध्या महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य माणूस व त्यांचे प्रश्न हे त्यांच्या पत्रकारितेचे कायम सूत्र राहिले आहे. समाजातील वंचित- उपेक्षित घटकांसाठी त्या सातत्याने लिखाण करतात. शोधपत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारच्या गैरप्रकारांवर वेळोवेळी प्रकाशझोत टाकला, हे प्रश्न तडीस नेले.

भयावह करोना संसर्गाची साथ पसरली आणि लॉकडाऊन लागला. या काळात महामारीला न घाबरता जगण्याच्या झगड्यात उभे राहिलेल्या सामान्य माणसांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष फिल्डवर शोधण्याचे व वृत्तपत्राच्या माध्यमातून ते मांडण्याचे काम शर्मिला ताईंनी सातत्याने केले. या प्रयत्नांची दखल घेत राज्यसरकारच्या कोव्हिड योद्धा या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

एकल महिलांचे प्रश्न, बालमृत्यूचे सातत्याने लपवण्यात येणारे आकडे,आश्रमशाळांमधील विद्यार्थीमृत्यू, बालगृहांची अवस्था, रक्तदान मोहिमेतील अनेक उण्या बाजू, रक्ताचा अपव्यय, दूषित रक्ताच्या प्रादुर्भावामुळे संसर्गित झालेल्या बालकांच्या आरोग्यहक्कासाठी ठोस भूमिका घेत सातत्याने त्यांनी प्रश्न मांडले. रुग्णालयांमधील गैरप्रकार तसेच व्यवस्था सुधारण्याच्या, सामान्य रुग्णाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या संघर्षात त्या ठामपणे उभ्या राहिल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची भूमिकाही त्यांनी वेळोवेळी चोख बजावली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाती घेतलेल्या जातपंचायतमुक्त मोहिमेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. मुंबईमध्ये महिलांना स्वच्छ, सुरक्षित शौचालये उपलब्ध व्हावी यासाठी सुरु झालेल्या ‘राईट टू पी’ या मोहिमेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे.

समाजातील वंचित घटकाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शर्मिला ताई भरीव कामगिरी करीत आहेत. समाजातील विधायक बाजू दाखवत असताना प्रस्थापित यंत्रणेला जाब विचारणे हेच पत्रकाराचे काम असते, हे समाजभान त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसते. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील शेवटचा माणूस हा पत्रकारितेचा केंद्रबिंदू असायला हवा हे ब्रीद कामय जोपासणाऱ्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.