डॉ. सुनिता बोर्डे -खडसे

यशस्विनी साहित्य सन्मान
सांगली
2023

असं म्हणतात की साहित्य वाचलं गेलं की संपूर्ण पिढी वाचली जाते. कथा, कादंबऱ्या यातून ही साहित्य परंपरा जपली जाते. सांगलीच्या डॉ. सुनिता बोर्डे -खडसे यांच्या सकस लेखणीतून अवतरलेल्या लिखानामुळे या साहित्य परंपरेत भर पडली आहे.

समाजभान जागृत ठेवून, अस्मिताभान जपत, नकुशा मुलीच्या दुःख-शोषणाच्या जाणीवेतून डॉ. सुनिता यांच्या लेखणीतून ‘फिन्द्री’ ही एक नवी कोरी कादंबरी अवतरली. या कादंबरीचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. डॉ. सुनिता यांनी दैनिक मासिकांमधून देखील चौफेर लिखाण केले आहे. कवितासंग्रह अस्तित्वाचा अजिंठा कोरताना, बालकविता संग्रह भाकरीचा बंगला ही त्यांची गाजलेली प्रकाशने !

श्रीमती सी.बी. शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे इतिहास विषयाच्या प्राध्यापक म्हणून डॉ. सुनिता बोर्डे कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधन आवडीतून त्यांनी ‘ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील स्त्रिया’ हा संशोधन ग्रंथ प्रकशित केला. लिखाणाबरोबरच महाराष्ट्रातील अनेक नामवंत बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये सदस्य म्हणून ते काम पाहतात. त्याचबरोबर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे अधिकारी म्हणून त्यांनी १६ वर्षे काम पाहिले आहे. त्यांची सामाजिक कार्याची आवड त्यांच्या लेखणीतून प्रकर्षाने जाणवते.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि कुसुमाग्रज साहित्य प्रतिष्ठानचा २०१७ सालचा विशाखा काव्य पुरस्कार, २०१८ चा फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार, २०२१ चा विश्वकर्मा साहित्य पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांमुळे त्यांच्या लेखणीला बळ मिळाले आहे.

आपल्या चतुरस्त्र लेखणीतून साहित्याच्या कशा रूंदावणाऱ्या आणि सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेल्या भावना आपल्या साहित्यात जपणाऱ्या डॉ. सुनिता बोर्डे -खडसे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी साहित्य सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी