सुमित पाटील

इनोव्हेटर पुरस्कार
2022

आयुष्य अनेक रंगानी भरलेले असते आणि या रंगात रमायला कोणाला आवडत नाही? लहानपणापासूनच रंगात रमणारा सुमित पाटील यांचा जन्म दादर नायगाव येथील पोलीस बीडीडी चाळीत झाला. राजा शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण घेत असताना सृजनात्मक कला प्रकारातून त्यांनी शाळेचे प्रतिनिधित्त्व केले आणि राष्ट्रीय पातळीवरचा मानाचा राष्ट्रीय 'बालश्री' पुरस्कार २००४ साली भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडून मिळाला.

आपण काढलेले चित्र जगातील प्रत्येक व्यक्तीला दिसावे, अगदी दृष्टीहीन व्यक्तींना देखील… त्यासाठी सुमित यांची धडपड होती. या दृष्टिहीन व्यक्तींना चित्र बघण्याची व काढण्याची नवीन दृष्टी सुमित यांनी दिली. “रंगगंध” एक नवी संकल्पना जन्माला आली. दृष्टिहीन लोकांना रंग कळावेत म्हणून रंगांमध्ये गंध मिसळले गेले. जसे की लाल रंगाकरीता गुलाबाचा गंध तर पिवळ्यासाठी चाफा…!

दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी सतत कार्यरत असणाऱ्या सुमितने डॉक्टरेट पदवी याच विषयात प्राप्त केली. या कलेच्या माध्यमातून मतिमंद, ॲसिड ग्रस्त महिला, तृतीयपंथी अशा समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुमित यांनी केले आहे. आज घडीला तीन हजार हून अधिक दृष्टीहीनांना “रंगगंध” ही संकल्पना शिकवून गेली १७ वर्षे या कार्यात त्यांनी स्वता:ला झोकून दिले आहे. दुबई येथे भरविण्यात आलेल्या EXPO 2020 मध्ये YOUNG ENNOVATOR पुरस्कार देऊन त्यांना दुबई सरकारने गौरविले आहे.

सुमित पाटील यांनी चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आज घडीला सुमित यांनी २४ सिनेमे, ६१ नाटकं, ९ मालिका यासाठी आपले कलादिग्दर्शन केले आहे.

सुमित यांच्या कार्याकडे बघताना असे जाणवते की “रंग” आपले जीवन सुखमय करतात. समाजातील दुर्लक्षित व्यक्तींच्या आयुष्यात रंग भरण्याचे हे काम असेच चालू राहावेत या सदिच्छा.

यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी