विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे वाढलेले मानवी आयुर्मान पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा सत्तरीच्या पुढे नेण्याचा विचार व्हावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा' या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. निवृत्तीनंतर न्यूनगंड न बाळगता ज्येष्ठांनी राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी पिढ्यांमधील दरी सांधण्यासाठी तरुण आणि ज्येष्ठांमध्ये सुसंवादाची गरज अधोरेखित केली.

या सोहळ्यात उल्लेखनीय कार्यासाठी प्रकाश घादगिने, बबन पाटणकर, भागीरथी बच्चेवार, वृषाली मगदूम, मानव कांबळे तसेच 'जनसेवा फौंडेशन' आणि 'ज्येष्ठ नागरिक संघ' (चोपडा) यांचा कृतज्ञता सन्मान देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. अनिल व्यंकटाचारी यांनी पार्किन्सन्स आजार व निरोगी जीवनशैलीवर मार्गदर्शन केले, तर 'नादब्रह्म' चमूने सांस्कृतिक सादरीकरण केले. विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविक, प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन आणि दीपिका शेरखाने यांनी आभारप्रदर्शन केले.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
04 ऑक्टोबर 2026

वीडियो गॅलरी