यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे माजी सनदी अधिकारी कै. शरद काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानात प्रसिद्ध विचारवंत व समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी “भारतात अल्कोहोल: वैज्ञानिक भूमिका व सामाजिक उपाय” या विषयावर विचार मांडले. केवळ कायद्याने दारूबंदी करण्याऐवजी सर्वसमावेशक 'दारू नीती' राबवणे व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत 'सर्च' संस्थेच्या 'मुक्तिपथ' प्रकल्पाद्वारे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण ६८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याचा स्वानुभव सांगत, हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चव्हाण सेंटर, ‘प्रथम’ संस्था आणि एशियाटिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात मुरलीधर नाले यांनी संपादित केलेल्या कै. शरद काळे यांच्यावरील "शरदाचे चांदणे" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले; यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




