नाशिक : जगण्यातल्या आनंदी क्षणांची हळुवार जाणीव असो किंवा दु:ख भरल्या वेदनांची अनवट दास्तान असो. या सर्व परस्परविरोधी अनुभवांचा वेध संगीतकार मदन मोहन यांनी आपल्या संगीत रचनातून घेतला. तीच अवीट गोडीची अनुभूती पुन्हा एकदा नाशिककर रसिकांना आली. सोबतीला ख्यातनाम लेखक अंबरीश मिश्र यांचे गाण्याइतकेच मधुर निवेदन रसिकांना मदनमोहन यांच्या सुमधुर आठवणीत घेऊन गेले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि, नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, संकलेचा कन्स्ट्रक्शन, नाशिक, जुम्मा मशिद चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वास लॉन्स व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपट संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने रसिकांना अवीट व मधुर गाणी देणारे संगीतकार मदन मोहन यांचे स्मरण म्हणून 'है तेरे साथ मेरी वफा' मैफलीचे विश्वास लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिध्द गायिका रागिणी कामतीकर, मिलिंद धटींगण व विवेक केळकर ही गाणी सादर केली. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन सुप्रसिध्द लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र यांनी केले. मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या आठवणी वाद्यरचनेचा अभिनव वापर याविषयी अंबरीष मिश्र अभ्यासपूर्ण आणि सहज निवेदनात उलघडून दाखिवल्या. मैफिलीची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.

रोजच्या अनुभवांना गीतकारांनी दिलेले शब्दरूप आणि संगीतकार मदन मोहन यांचा स्वरसाज शब्दांना श्रीमंती बहाल करणारा होता. मदन मोहन यांच्या गीतांच्या आठवणी शब्दसुरांच्या शोधयात्रेचे सारेजण यात्रिक झाल्याचा अनुभव इथे रसिकांना आला. वो भूली दास्तां लो फिर याद आ गई, लग जा गले कि फिरसे हसीं रात हो ना हो, हम प्यार में जलने वालों को चैन कहां, भुली हुई यादों मुझे इतना ना सताओं, जरा सी आहट होती है दिल सोचता है, रस्मे-ए-उल्फत को निभाए तो निभाए कैसे, फिर वही शाम वही गम वही तनहाई है, ऐ दिल मुझे बता दे, तु किस पे आ गया है, वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है अशा अनेक गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री शिंपी, दीपांजली महाजन यांनी केले. तर आभार डॉ. कल्पना संकलेचा यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक