नाशिक : विद्यार्थ्यांनी आपल्यातील कल्पकता, कुतूहल कायम जागरूक ठेवणे गरजेचे असून आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समाजासाठी उपयुक्त असे विधायक संशोधन करावे व देशविकासाला हातभार लावावा. तसेच आजच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा शोध घेणे शाळांबरोबरच सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सायन्स टुर्ससारखे उपक्रम दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन विश्वास को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले.

आर.एस. सायन्स टुर्स ही संस्था ‘पर्यटनातून संशोधन’ या संकल्पनेवर विज्ञान पर्यटन हा उपक्रम राबवत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या माध्यमातून शास्त्रज्ञांबरोबर संशोधनावर आधारीत चर्चासत्राचे आयोजन रचना विद्यालय हायस्कूल, शरणपूररोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी विश्वास ठाकूर यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.

रचना विद्यालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी सहस्त्ररस्मी पुंड यांनी पेटंट्स कॉपीराईट्स आणि ट्रेडमार्क याविषयी मार्गदर्शन केले. एखाद्या संकल्पनेला पेटंट पर्यंत पोहोचवून देण्यात प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही श्री. पुंड यांनी दिले.

पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे एन.टी. कासार यांनी रोजच्या जीवनातील संशोधन प्रत्येक राज्यातील विज्ञान केंद्र आणि तेथील प्रोजेक्ट्स याबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रयोग येथे मांडण्यात आले होते. त्याचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी रचना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता टाकळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आर.एस. सायन्स टुर्सचे रवींद्र शास्त्री यांनी केले व भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक