नाट्य शिबिरातून जगाकडे बघण्याची जाणीव निर्माण होते

नाशिक : नाटक ही कला रोजच्या घडणार्‍या प्रसंगातून निर्माण होणारी कला असून आजुबाजूच्या घटनांचे पडसाद त्यात कलावंत अभिनयातून मांडत असतो. नाट्यशिबिरे ही समाजाकडे डोळस दृष्टीने बघण्याची जाणीव करुन देतात. त्यातून मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. नाट्यशिबीरे ही जीवन समजून घेण्याची उपयुक्त कला आहे. त्याचबरोबर आनंद देणारी कला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाट्यलेखक राजा ठाकूर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालनाट्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आलेले असून शिबिराच्या शुभारंभप्रसंगी राजा ठाकूर हे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, नाटक ही मेहनत व कष्टातून शिकण्याची कला आहे. साध्या प्रसंगातून मोठा विचार त्यातून व्यक्त होतो. समाज परिवर्तनाचे ते प्रभावी माध्यम आहे. मराठी रंगभूमी ही समृद्ध असून अनेक महान कलावंतांनी योगदान दिलेले आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. या शिबिराची संकल्पना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर यांची आहे.
स्वागत व प्रास्ताविक करतांना श्री. विनायक रानडे म्हणाले की, आजच्या व्हॉटसअ‍ॅपच्या व चॅनलच्या जमान्यात मुलांना खरा आनंद अशा शिबिरातून मिळतो म्हणूनच बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर शिबीर 8 वर्षापुढील मुला-मुलींसाठी असून रविवार 22 ते शनिवार 28 एप्रिल 2018 या कालावधीत सायं. 4 ते 7 या वेळेत क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सुरु आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक