मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विविध क्षेत्रांतील सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत आणि पत्रकारांच्या उपस्थितीत एक दिवसीय राज्यव्यापी निर्धार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी स्पष्ट केले की, जनतेचे जीवन सुसह्य करणे हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ असून त्यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा पुढे नेणे आवश्यक आहे. शाळा बंद करून नव्या पिढीला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, असे सांगत त्यांनी राज्यातील वाढते असहिष्णू वातावरण आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबद्दल तीव्र खंत व्यक्त केली; तसेच जनहितासाठी लढणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी चव्हाण सेंटर खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.

दरम्यान, चव्हाण सेंटर हे राजकारणविरहित व्यासपीठ असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्याच्या सर्व महसुली विभागांमध्ये अशा परिषदा घेतल्या जातील, असा निर्धार कार्याध्यक्षांनी व्यक्त केला. सशक्त लोकशाहीसाठी सामाजिक संघटनांचा आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे आणि आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता जपणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या विचारमंथन परिषदेला सरचिटणीस हेमंत टकले यांच्यासह डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या चळवळीतील सहकाऱ्यांसह अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते—प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, ॲड. जयदेव गायकवाड, डॉ. श्याम मानव, सुभाष लोमटे, सुरेश खोपडे, नितीन वैद्य व सुभाष वारे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी केले, सूत्रसंचालन विकास लवांडे यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता बाळसराफ यांनी केले.

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
01 सप्टेंबर 2024