यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ‘कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार’ वितरण सोहळ्यात, महानोर हे केवळ कवी नसून शेती व पाणी हा त्यांच्या जीवनाचा ध्यास होता, अशा शब्दांत यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांचा गौरव केला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी महानोर व जैन परिवारातील ७५ वर्षांच्या स्नेहबंधांना उजाळा दिला, तर चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पवार-महानोर यांच्या चार दशकांच्या घनिष्ठ नात्याचा उल्लेख करत भावी पिढीसाठी अस्सल इतिहास आणि साहित्याची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला.

या सोहळ्यात शेती-पाणी संवर्धनासाठी शीला खुणे व वर्षा हाडके, तर साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी गणेश घुले, महेश लोंढे, नामदेव कोळी आणि प्रदीप कोकरे या सहा होतकरूंना प्रत्येकी २५ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, विश्वस्त विवेक सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व महानोर कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. दत्ता बाळसराफ यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सोहळ्याची सांगता ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या वारकरी संप्रदायावरील सुरेल सांगीतिक कार्यक्रमाने झाली.

द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
19 सप्टेंबर 2024