यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य आणि शेती-पाणी पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा ११ सप्टेंबर रोजी मुंबईत उत्साहात संपन्न झाला. सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. सुधींद्र कुलकर्णी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. "महानोरांचे विचार आणि कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल," अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रफितीच्या माध्यमातून महानोरांच्या मातीशी घट्ट नाळ जोडणाऱ्या साहित्याचा आणि ग्रामीण जीवनदर्शनाचा गौरवपूर्ण पट उलगडला.
यंदाच्या साहित्य पुरस्काराने कवी अविनाश उषा वसंत, श्रीकांत साव, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी व कादंबरीकार विठ्ठल खिलारी यांना, तर शेती-पाणी व्यवस्थापनातील उल्लेखनीय योगदानासाठी वैशाली पाटील आणि सीमा क्षीरसागर यांना सन्मानित करण्यात आले. महानोरांच्या जीवनपटावर आधारित चित्रफीत आणि 'परिवर्तन, जळगाव' प्रस्तुत संत कबीरांच्या तत्त्वज्ञानावरील 'हंस अकेला' या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्यात विशेष रंग भरला. महानोर कुटुंबीयांसह साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.




