मुंबई :यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिव्यांगांसाठी 'नाविन्यपूर्णता, न्यू स्टार्टअप्स, सुगम्यता आणि उपजीविका' या विषयावर विशेष परिषद पार पडली. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात दिव्यांगांच्या राजकीय आरक्षणाची मागणी करण्याचे आश्वासन दिले. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र परिषदांऐवजी 'समावेशित परिषदा' (Inclusive Conferences) भरवण्याची सूचना करत त्यांनी 'सॉल्विथॉन'मधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक केले आणि कौशल्य विकासासाठी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

या परिषदेला विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिन अहिर यांनी राज्यस्तरीय सर्वेक्षणातून कृती आराखडा तयार करण्याचा व आमदार निधीचा वापर दिव्यांगांसाठी करण्याचा मानस व्यक्त केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिव्यांगांच्या स्टार्टअप्सना मदत करण्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातही 'दिव्यांग भवन' उभारण्याचे आश्वासन दिले. तर आमदार बच्चू कडू यांनी १५ वर्षांच्या लढ्याचा आढावा घेत, शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे काम करून दिव्यांगांना हक्क मिळवून द्यावेत आणि आपण आयुष्यभर त्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी सचिव जितेंद्र पापळकर आणि आयुक्त सत्यजित बडे यांनी राज्यभरातील सर्वेक्षण व जीवनचक्रावर आधारित माहिती संकलनाचे महत्त्व अधोरेखित करत वैयक्तिक योजनांसाठी निधी वाढवण्याची गरज मांडली. माजी सनदी अधिकारी ओमप्रकाश देशमुख व जीएसटी कमिशनर नितीन पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नंदकुमार फुले लिखित 'दिव्यांगांसाठी सर्व काही' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. दीपिका शेरखाने व चव्हाण सेंटरच्या टीमने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले, तर 'टीच' संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
18 नोव्हेंबर 2026

वीडियो गॅलरी