नाशिक येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांना पुरस्कार देऊन गौरविले. या वेळी बोलताना त्यांनी हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालत असून महाराष्ट्राच्या प्रगतीची व सामाजिक क्रांतीची जबाबदारी युवा पिढीवर असल्याचे प्रतिपादन केले. यशवंतराव चव्हाणांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षणाच्या विचारांचे स्मरण करून देत त्यांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि ड्रग्जविरोधात सर्व राजकारण बाजूला ठेवून एकत्र लढण्याचे आवाहन केले. तसेच, पालकांच्या योगदानाचे कौतुक करतानाच स्त्रीभ्रूणहत्या व महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोट ठेवत, मुलींना योग्य वेळी 'नाही' म्हणायला शिकवणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.




