सोलापूर : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिग्निया कंपनीच्या वतीने सोलापूर येथे कर्णबधीर आणि जेष्ठ नागरिकांसाठी श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रसिद्ध गायिका अनुराधा पाैडवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात चव्हाण सेंटरच्या लोकोपयोगी उपक्रमांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. चव्हाण सेंटर ही लोकांसाठी काम करणारी एक उत्तम संस्था आहे, अशा शब्दात अनुराधा पौडवाल यांनी सेंटरचा गौरव केला.

चव्हाण सेंटरच्या आरोग्य व ज्येष्ठ नागरिक विभागातर्फे कर्णबधीर आणि जेष्ठ नागरिकांसाठी राज्यभर कर्ण तपासणी आणि श्रवणयंत्र वाटप उपक्रम घेण्यात येतो. त्यानुसार सोलापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुराधा पाैडवाल, चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, सिग्निया कंपनीचे सीईओ अविनाश पवार, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आदी यावेळी उपस्थित होते. दिप्ती नाखले यांनी सर्वांचे स्वागत केले व चव्हाण सेंटरची भूमिका आणि सुरू असलेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली. तर आरोग्य, दिव्यांग व जेष्ठ नागरिक विभागाचे संयोजक विजय कान्हेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग करत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतीनिधि स्वरूपात पाच मुलांना श्रवणयंत्र बसविण्यात आले व त्यानंतर सर्व लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

अनुराधा पाैडवाल यांनी यावेळी बोलताना आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रियाताईंसोबच्या आठवणींना उजाळा दिला. चव्हाण सेंटर आणि सिग्निया कंपनी एक चांगला उपक्रम राबवत आहेत. ही फार आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी आमदार व नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत चव्हाण सेंटरच्या सामाजिक कार्याचे काैतुक केले. चव्हाण सेंटर लोकांसाठी काम करणारी एक उत्तम संस्था असल्याचे गाैरोद्गार त्यांनी काढले. सिग्निया कंपनीचे सीईओ अविनाश पवार यांनी खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर सिग्निया कंपनी कशाप्रकारे या सामाजिक उपक्रमात सहभागी झाली, याचा घटनाक्रम तपशीलवार सांगितला. याबरोबरच सध्याच्या जीवनशैलीमुळे कानावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहितीही त्यांनी दिली. श्रवणयंत्र वाटपानंतर कर्णबंधीरांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य खुप काही सांगून जात होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरने सिग्निया कंपनीच्या सहकार्याने यावर्षी आतापर्यंत तीनशेहून अधिक लाभार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप केले आहे. चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे, जेष्ठ सदस्य दत्ता गायकवाड, कार्यक्रमाचे व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, सोलापूर केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, आरोग्य,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभागाच्या प्रमुख दिपीका शेरखाने, समन्वयक अभिजित राऊत, सहाय्यक मनिषा ल खिल्लारे, सोलापूर केंद्राच्या सहाय्यक तेजस्विनी श्रीरेखम, शशीभूषण यलगुलवार आदी यावेळी उपस्थित होते. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड आणि सोलापूर सखाचे विशेष सहकार्य लाभले.