पुणे : युवापिढीचे काैतुक आणि दिशा देण्यासाठी चव्हाण सेंटरतर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते आणि आजच्या२१ व्या शतकात आपण इनोव्हेशन पुरस्कार देखील देत आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ही माहिती दिली. चव्हाण सेंटरच्या वतीने 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार' प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

रंगमंचीय कलाविष्कार, क्रीडा, साहित्य, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता आणि नवनिर्मिती या विषयांत उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण आठ युवक आणि सात युवतींना यावेळी खासदार सुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय युवा पुरस्कार देण्यात आले. सन्मानपत्र आणि २१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे राजू जगताप, चव्हाण सेंटरचे विश्वस्त अजित निंबाळकर, जिल्हा केंद्र पुणेचे सचिव अंकुश काकडे, आनंद अवधानी, डॉ. गणेश चंदनशिवे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, "आपल्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. पण ती परंपरा आपण विसरत आहोत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मी मागील आठवड्यात एका शाळेत गेले होते तिथे यशवंतराव चव्हाण कोण होते? असा प्रश्न विचारला असता फक्त एका मुलालाच याचे उत्तर देता आले. याचा अर्थ आपण नव्या पिढीला सांगण्यात कमी पडत आहोत. अगोदरची पिढी प्रगल्भ होती.पण आज कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेतली जात आहे. आज माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे एआयमुळे अनेक समीकरणे बदलताना दिसत आहेत. एकीकडे एआय मुळे अनेकांचे जाॅब धोक्यात आले आहेत. तर दुसरीकडे एआयवर आधारित असलेल्या शेतीसाठीची देशातील पहिली लॅब बारामतीत होत आहे. मायक्रोसाॅफ्टच्या माध्यमातून त्याठिकाणी शेतीच्या सुयोग्य नियोजणासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे चव्हाण सेंटरतर्फे एआयच्या बाबतीत यापुढे काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर एक थिंक टँक देखील तयार केला जाणार आहे. "

अत्यंत उत्साह आणि युवक युवतींच्या जल्लोषात पुण्यात आज हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अनेक तरुणांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी यावेळी संवाद साधला. चेतन कोळी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त युवक युवतींची नावे पुढील प्रमाणे - युवा क्रीडा पुरस्कार - स्वप्नील कुसळे, अदिती स्वामी सामाजिक युवा पुरस्कार- राजू केंद्रे, राही मुजुमदार रंगमंचीय कलाविष्कार - जगदीश कन्नम, मयूर शितोळे, पर्ण पेठे युवा साहित्यिक पुरस्कार - पूजा भडांगे, अमोल देशमुख युवा उद्योजकता पुरस्कार - संदेश भोसले, मीनल वर्तक पत्रकारिता युवा पुरस्कार - कुलदीप माने, दिपाली जगताप इनोव्हेशन युवा पुरस्कार - डॉ. प्रशांत खरात, साक्षी धनसांडे