पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी सन्मान पुरस्काराची घोषणा आज सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार, ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती चेतना सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरणाला २२ जून रोजी ३२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सुळे यांनी सांगितले.
आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका सुनंदा भोसेकर यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', पर्यावरणस्नेही वैशाली घुगे यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', महिलांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मालतीताई सगणे यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान’, पत्रकार प्रगती बाणखेले यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, यशस्वी व्यावसायिक प्राची जागुष्टे- महाजन यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान’ आणि जिम्नॅस्टिक या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक सविता मराठे यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचा रेखाताई नार्वेकर पुरस्कृत 'युवा यशस्विनी पुरस्कार' ॲड. परिक्रमा खोत यांना देण्यात येणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात सकाळी साडे दहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या या सातजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण देशभरात महाराष्ट्र शासनाने प्रथमच १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा ३२ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून राज्यातील कर्तृत्ववान महिलांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सन्मानित करण्यात येते. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर वरील सात जणींचा सन्मान करण्यात येत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.




