मुंबई - विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवी आयुर्मान लक्षणीयरीत्या वाढले आहे; त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीची प्रचलित वयोमर्यादा सत्तरीच्या पुढे नेण्याचा विचार व्हावा, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुंबईत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्तीनंतर सार्वजनिक जीवनातूनही आपण निवृत्त झालो आहोत, असा कोणताही न्यूनगंड न बाळगता ज्येष्ठांनी आपली ‘तिसरी इनिंग’ राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि सर्जनशील उपक्रमांसाठी समर्पित करावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ पिढीकडे असलेला प्रदीर्घ अनुभव, ज्ञान आणि कौशल्य नव्या पिढीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावू शकते, यावर भर देत त्यांनी वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांनी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतही सक्रिय पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी पिढ्यांमधील दरी (जनरेशन गॅप) सांधण्यासाठी दोन्ही पिढ्यांमध्ये सुसंवाद घडण्याची नितांत गरज व्यक्त केली. ज्येष्ठांनी केवळ समवयस्कांपुरते मर्यादित न राहता तरुणांशी मैत्रीपूर्ण नाते जोपासावे आणि तरुणांनीही ज्येष्ठांच्या अनुभवांचा आदर करावा, ज्यातून एका समावेशक समाजाची निर्मिती होईल, असा विचार त्यांनी मांडला. या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रकाश घादगिने (लातूर), बबन पाटणकर (ठाणे), भागीरथी बच्चेवार (नांदेड), वृषाली मगदूम (रायगड), मानव कांबळे (पुणे) यांच्यासह ‘जनसेवा फौंडेशन’ (पुणे) आणि ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ (चोपडा, जळगाव) यांचा समावेश होता.

या सोहळ्याची सुरुवात सुरज भोईर यांच्या प्रार्थनेने झाली, तर विभागाचे संयोजक विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविकातून सेंटरच्या उपक्रमांचा आढावा घेत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. प्रारंभी उदय रामदास आणि मृण्मयी फाटक यांच्या 'नादब्रह्म' चमूने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित विशेष सत्रात प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल व्यंकटाचारी यांनी पार्किन्सन्स आजाराची लक्षणे, उपचार आणि निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. निवड समितीच्या वतीने ॲड. प्रमोद ढोकले यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रिया पाटील यांनी तर आभारप्रदर्शन विभागप्रमुख दीपिका शेरखाने यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मनिषा खिल्लारे, वंदना वाळीकर, मीनल सावंत, प्रशांत इखर, अशोक जाधव व सुरज पवार यांनी परिश्रम घेतले.