ठाणे, दि. २१ (प्रतिनिधी) - महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील रिलायन्स मॉल मध्ये बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाराष्ट्रातील तब्बल ४५ बचत गटांतील महिलांना या उपक्रमामुळे हक्काची बाजारपेठ मिळाली.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महीला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्विनी प्रकल्प चालू केला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे येथील रिलायन्स मॉल मध्ये आज या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऋता आव्हाड, रिलायन्सचे जगदीश पांचोली, पराग दळवी, वल्लभ सौदागर, पार्थ शर्मा, राहुल चौधरी, जॉन्सन जॉन, अविनाश जोशी आदी उपस्थित होते.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उभारलेल्या यशस्विनी सामाजिक अभियाना अंतर्गत राज्यातील हजारो महिलांनी महिला बचत गट तयार केले असून त्यामार्फत अनेक उद्योग व्यवसाय उभारले जात आहेत. या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी खासदार सुळे या प्रयत्नशील होत्या. त्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि गेल्या महिन्यात पुण्यातील कोंढवा येथील रिलायन्स मॉल मध्ये पहिले प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या प्रदर्शनाला 'सुगरण' हे एक खास नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आज ठाण्यातील प्रदर्शनात।राज्यभरातून तब्बल ४५ बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली. हा उपक्रम यापुढेही असाच चालू राहणार असून राज्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट यात जोडले जाणार असून त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आपण मिळवून देऊ, अशी ग्वाही यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी दिली.