मुंबई: राज्यात आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे. जल, जंगल आणि जमीन याचे खरे मालक आदिवासी आहेत. पण काही जण त्यांना वनवासी म्हणतात. आदिवासींना वनवासी म्हणणे हा त्यांचा अपमान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त २०२२ चा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. प्रेमजी यांच्या वतीने के. आर. लक्ष्मीनारायण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पाच लाख रुपयांचा धनादेश आणि यशवंतराव चव्हाण यांची प्रतिकृती असे आहे. या वेळी सेंटरच्या वतीने 'आदिवासी कल्याण केंद्राची' स्थापना करण्यात आली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, आदिवासींच्या हितासाठी जे जे संघर्ष करतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची भूमिका आहे. पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सामाजिक, राजकीय जीवनातील योगदानाविषयी विवेचन केले. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. गरज पडल्यावर केंद्रात गेले. तेथे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळली. ग्रंथ हीच त्यांची संपदा होती.

या कार्यक्रमात चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना चव्हाण साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्याचा प्रांजळ प्रयत्न चव्हाण सेंटर करीत आहे.

याप्रसंगी डॉ. अनिल काकोडकर, उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कोषाध्यक्ष हेमंत टकले, अजित निंबाळकर, बाळकृष्ण आगरवाल, विवेक सावंत, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, डाॅ. समीर दलवाई, चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.