पात्र शिक्षकांना नाविन्यपुर्ण उपक्रमांसाठी नामवंत शिक्षणतज्ज्ञ करणार मार्गदर्शन

मुंबई दि ३० (प्रतिनिधी) - 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबईच्या वतीने शिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’च्या फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या नावांची घोषणा २ मे रोजीच्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत करण्यात येणार आहेत. अशी माहिती खासदार आणि सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

शरद पवार इन्स्पायर फेलोशीपसाठी १ जानेवारी २०२२ पासून प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांवर सविस्तर विचार करुन तज्ज्ञ समितीने फेलोंची निवड केली आहे. त्याचबरोबर या फेलोंच्या नावांची घोषणा http://sharadpawarfellowship.com/result/education-result या वेबसाईटवर २ मे रोजी दुपारी तीन वाजता जाहीर केली जाणार आहे. शरद पवार यांच्या संस्मरणीय आणि दैदीप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी,साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंत तरुणांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशीप सुरु करण्यात आली आहे. कृषी आणि साहित्य क्षेत्रातील फेलो यापुर्वीच जाहिर झाले आहेत. तर शिक्षण क्षेत्रातील फेलोंची घोषणा २ मे रोजी जाहीर होणार आहे.

शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे निमित्त साधत 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'ची सुरूवात करण्यात आली आहे. फेलोशिपसाठी मात्र ठरलेल्या फेलोंना शैक्षणिक क्षेत्रात अभिनव आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी नामवंत अभ्यासक शिक्षणतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.