मुंबई : आज एआयकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा फायदा देखील आहे, आणि प्रचंड तोटे आहेत. ते भाषण सुद्धा तुम्हाला हव्या तेवढ्या मिनिटाचे करून देते, मेंदु देखील चालवावा लागत नाही. चॅट जिटीपी प्रोजेक्ट छान करते, पण त्यातून आपण खरच शिकणार आहोत का? सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. त्यात ओपन बुक संकल्पना आहे, पण त्याचा वापर ज्याने पुस्तक वाचले आहे, तोच करू शकतो. त्यामुळे आता फेलोशिपकडे वेगळया नजरेने पाहण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

आदरणीय पवार साहेबांच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिप प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फेलोशिप चे हे पाचवे वर्ष असून गुणवत्ता असूनही अनेक जण संधी नसल्यामुळे पुढे येत नाहीत, त्यांना न्याय देण्यासाठी ही फेलोशिप सुरु करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वर्षी कृषी साठी ४०, साहित्य साठी १२ आणि शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण ८२ फेलोंची निवड करण्यात आली असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी फेलोंना फेलोशिप प्रदान करण्यात आली.

डॉ.एस.एस.मगर, नेहा कुलकर्णी, निलेश नलावडे, विलास शिंदे, प्रा.डॉ.नितीन रिंढे, अदिती नलावडे, यांच्यासह चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, फेलोज, त्यांचे पालक आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

आपण एक वर्षासाठी फेलोशिप देत आहोत, पण त्या फेलोंना एक वर्षानंतर देखील मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात, फक्त त्यांना एक व्यासपीठ मिळण्याची गरज असते. त्यामुळे नवीन फेलोनी नवीन काहीतरी घडवावे. नवीन धोरणाच्या माध्यमातून तुमच्या जीवनात चांगला बदल घडला पाहिजे, त्याचबरोबर समाजातही चांगला बदल घडला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यश अपयश येत राहते, पण प्रयोग थांबले नाही पाहिजेत. त्यामुळे एक ध्येय ठेवून काम करत रहा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

विज्ञान तंत्रज्ञान, एआय कितीही विकसित झाले तरी आनंद आणि सुखासाठी माणसेच लागतात, आणि हीच माणसे जोडण्याचे काम यशवंतराव चव्हाण सेंटर करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच फेलोशिपसाठी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती, एम.के.सी.एल. फाऊंडेशन आणि सह्याद्री फॉर्म्स नाशिक यांचे सहकार्य लाभत आहे, त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले.