नांदेड: ता १८ : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या नांदेड जिल्हा केंद्रातर्फे 'जीवन सुंदर आहे' या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी "जीवन सुंदर व्हावे यासाठी निश्चित असा कुठलाही फॉर्म्युला नसतो; परंतु आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होत असते!" असे प्रतिपादन गणेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नांदेडकरांची मोठी गर्दी झाल्याने श्रोत्यांसाठी कुसूम सभागृहाचे व्यासपीठ रिकामे करून श्रोत्यांना जागा उपलब्ध करून द्यावी लागली.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या नांदेड जिल्हा केंद्रच्या वतीने कुसूम सभागृहात 'जीवन सुंदर आहे' या विषयावर गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रतिष्ठानच्या नांदेड जिल्हा केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, सदस्य नरसिंग आठवले यांनी गणेश शिंदे स्वागत केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने उभे असलेले सेंटर हे एक पक्षनिरपेक्ष व्यासपीठ असून येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने भरीव काम करीत यशवंतरावांचा विचार तळागाळापर्यंत नेण्यासाठी हे सेंटर कार्य करीत असते असे समन्वयक डॉ श्रीराम गव्हाणे यांनी प्रास्ताविक करताना स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले, की "सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत पण दुःखात सुद्धा आनंदाचे दोन क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचे. आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावे, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात; परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो. घर कितीही मोठे, लहान असू देत पण कायम एक खोली कमीच असल्याचे दुःख आपण बाळगतो. ही लालसा आपण सोडली पाहिजे. आताची पिढी खूप बुद्धिमान आहे; परंतु दुसऱ्याचे ऐकण्यात तिला स्वारस्य नाही. आज लहान मुलांचे डोळे मोबाईलमुळे व्याधीग्रस्त झाले आहेत. आईच्या स्पर्शापेक्षा लहान मूल मोबाईलच्या सान्निध्यात शांत राहते, हा मातृत्वाचा पराजय आहे. आपला ध्येयापर्यंतचा प्रवास जीवनातील लहान सहान गोष्टींचा आनंद घेत पूर्ण झाला पाहिजे. निसर्ग हा आपण देतो त्याच्या कित्येक पटीने आपल्याला परत देत असतो. त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला मदत करणाऱ्यांच्या यादी पेक्षा आपण मदत केलेल्यांची यादी मोठी होईल तेव्हाच आपले जीवन सुंदर होईल! पैसा जरूर कमवा; पण तो सत्कार्यासाठी खर्च करायला शिका. कला आत्मसात करा. आपल्या आवडीनिवडीचा शोध घ्या. आयुष्यातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्या म्हणजे जगणे सुंदर होईल!" दैनंदिन जीवनातील प्रसंग आपल्या नर्म विनोदी शैलीतून कथन करीत शिंदे यांनी श्रोत्यांना हसवत अंतर्मुख केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी अंबुलगेकर यांनी केले. तर प्रमुख व्याख्याते शिंदे यांचा परिचय सेंटरच्या कोषाध्यक्ष कल्पना डोंगळीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. संदीप देशमुख यांनी व्यक्त केले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नांदेड जिल्हा केंद्राचे सदस्य बापू दासरी, डॉ मनोरमा चव्हाण, दिलीप बाळसकर तर प्रतिष्ठाणचे समन्वयक डॉ शुभांगी पाटील, डॉ अनिल देवसरकर, शंतनू कैलासे तसेच भारत होकर्णे, सदा वडजे, विकास कदम, सुधाकर अडकीने, शेख रफिक आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. व्याख्यान ऐकण्यासाठी नांदेडकरांनी भाऊगर्दी केल्याने सभागृहाच्या बाहेरही एलईडी स्क्रीनवर व्याख्यानाचा लाभ घेतला हे विशेष होय.