सोलापूर, दि.२६ ऑक्टोबर (प्रतिनिधी) - एक स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते उपपंतप्रधान हा यशवंतराव चव्हाण यांचा प्रवास हा एक अत्यंत सुसंस्कृत शालीन विचाराने, विवेकी अशा गुणात्मकतेने एक आदर्श घालून देणारा झाला आहे; त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांची आठवण महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा. आनंदराव जाधव यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा केंद्र सोलापूर आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रा.आनंदराव जाधव यांनी यशवंतरावांची जीवनमूल्ये यावर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. शिक्षणाची गंगोत्री असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी काम पाहिले. महाराष्ट्रातील खेड्यापर्यंत शिक्षण हे पोहोचले पाहिजे, या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याचा जागर यशवंतरावांनी मुख्यमंत्री असताना प्रशासनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. सामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे ही तळमळ कर्मवीर अण्णांमध्ये होती; ती त्यांनी सिद्धही केली होती. तोच वसा यशवंतरावांनी नंतर पुढे चालू ठेवला. युवकांना केंद्रस्थानी मानून शिक्षण आणि कृषी औद्योगिक धोरण यशवंतरावांनी राबवले. साम्यवाद असेल तिथे आदर्श राज्य बनू शकते, असा यशवंतरावांचा मानस होता. सुरुवाती पासून रॉयवादी असलेल्या यशवंतरावांनी सामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणूनच कार्य केले आहे. शिवाजी विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ याची निर्मिती हे यशवंतरावांच्या शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचे उदाहरण आहे. विचारांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, एम.एन. रॉय, पंडित नेहरू या सगळ्यांच्या विचाराचे जतन करत त्यांनी कार्य केले आहे.

यशवंतराव हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असले तरी यशवंतरावांचे शिल्पकार या त्यांच्या मातोश्री विठाई होत्या. त्यांचे पाठबळ यशवंतरावांना होते म्हणूनच समृद्ध यशवंतराव आपल्याला लाभले हे देखील विसरून चालणार नाही. याप्रसंगी प्रा.आनंदराव जाधव यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनातील अनेक दाखले देत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यानंतर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. मुंडे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा.आनंदराव जाधव आणि उद्योजक मा. दत्ता अण्णा सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी तसेच सोलापूर जिल्हा केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, सदस्य शेरअली शेख, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक सुशांत कुलकर्णी, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.